विशाखापट्टणम : सहा वर्षांच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण; काही क्षणांतच मृत्यू

गृहपाठ पूर्ण केला नसल्याच्या कारणावरून शिक्षिकेने सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना विशाखापट्टणममध्ये समोर आली आहे. शिक्षिकेने मुलाच्या कानशिलात लगावल्यानंतर काही क्षणांतच तो तिच्या अंगावर कोसळला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
विशाखापट्टणम : सहा वर्षांच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण; काही क्षणांतच मृत्यू

विशाखापट्टणम : गृहपाठ पूर्ण केला नसल्याच्या कारणावरून शिक्षिकेने सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना विशाखापट्टणममध्ये समोर आली आहे. शिक्षिकेने मुलाच्या कानशिलात लगावल्यानंतर काही क्षणांतच तो तिच्या अंगावर कोसळला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी शाळेत शिक्षिका विद्यार्थ्यांचा गृहपाठ तपासत होती. संबंधित सहा वर्षांच्या मुलाचा गृहपाठ अपूर्ण असल्याचे दिसल्यानंतर शिक्षिका संतापली. यावेळी घाबरलेला मुलगा रडत रडत आपल्याला मारू नका, अशी विनवणी करत होता. मात्र, शिक्षिकेने त्याच्या शर्टाला पकडून त्याला खेचले आणि त्याच्या गालावर चापट मारली. त्यानंतर काही सेकंदांतच मुलगा शिक्षिकेच्या अंगावर कोसळला.

सीसीटीव्हीत नेमके काय दिसले?

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिक्षिका मुलावर ओरडताना दिसत आहे. शिक्षिका संतापल्याचे पाहून मुलगा रडू लागतो आणि हातवारे करत तिला विनवणी करताना दिसतो. त्यानंतर शिक्षिका त्याचा शर्ट पकडून त्याला खेचते. गणवेश व्यवस्थित करत असतानाच ती मुलाच्या गालावर चापट मारते. पुढच्याच काही क्षणांत मुलगा तिच्या अंगावर कोसळतो. मुलगा खाली पडल्यानंतर शिक्षिकेने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले;  मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पालकांचा शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप

मुलाच्या कुटुंबीयांनी शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  मुलाच्या वडिलांनी दावा केला की, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शाळेकडून त्यांना तातडीने माहिती देण्यात आली नाही. एका नातेवाईकाकडून त्यांना घटनेची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मुलाची त्या दिवशी प्रकृती खराब होती, ही शक्यताही वडिलांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शिक्षिकेच्या मारहाणीमुळेच मृत्यू झाला का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

मंत्र्यांकडून शोक व्यक्त

या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मनुष्यबळ विकास मंत्री नरा लोकेश यांनी शोक व्यक्त केला. सहा वर्षांच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे पाहून मन हेलावून गेल्याचे त्यांनी म्हटले.

दोषी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई केली जात असून, सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा