नवी दिल्ली : ‘माझ्या आयुष्याबद्दल लिहिणे माझ्यासाठी सहज नव्हते. मनाच्या खोलवर जपून ठेवलेले क्षण व अनुभव इतरांसोबत शेअर करत आहे,’ असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ हे ५४४ पानांचे आत्मचरित्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकाशित होत आहे.
सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, त्यांच्या आगामी आत्मचरित्राच्या लेखनादरम्यान त्यांना आयुष्यातील अत्यंत खासगी अनुभवांबद्दल खुलेपणाने लिहावे लागले. या पुस्तकात युद्धोत्तर इटलीतील बालपणापासून भारतातील आगमन, राजीव गांधी यांच्यासोबतचे जीवन, कुटुंबावर कोसळलेले दु:खद आघात आणि त्यानंतर राजकारणात झालेला प्रवेश, असा त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे.
‘दु:ख आणि जवळच्या व्यक्तींच्या निधनामुळेच मला सार्वजनिक जीवनातील राजकारणात यावे लागले. तोपर्यंत मी माझ्या खासगी आयुष्याचे जाणीवपूर्वक संरक्षण केले होते,’ असे गांधी यांनी म्हटल्याचे प्रकाशक अल्फ्रेड ए. नॉफ यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले.
आत्मचरित्र नॉफ प्रकाशनाकडून १० नोव्हेंबर रोजी हार्डकव्हर आणि ई-बुक स्वरूपात प्रकाशित केले जाणार आहे. ऑडिओ आवृत्ती पेंग्विन रँडम हाऊसकडून प्रसिद्ध केली जाईल. या पुस्तकाची पहिली आवृत्ती एक लाख प्रतींची असेल.
गांधी यांनी या आत्मचरित्राचे वर्णन आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या ‘हृदयातील कोमल आनंद आणि गडद निराशेच्या प्रवासाचे साक्षीदार’ असे केले आहे.
इटलीपासून भारतापर्यंतचा प्रवास
या पुस्तकाची सुरुवात १९६५ मध्ये इंग्लंडमधील केंब्रिजपासून होते. त्यावेळी १९ वर्षीय सोनिया यांची राजीव गांधी यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन वर्षांनंतर दोघांनी विवाह केला. त्यानंतर युद्धोत्तर इटलीतील एका छोट्या शहरातील बालपणापासून भारतातील जीवनापर्यंतचा सोनिया गांधी यांचा प्रवास सुरू झाला. पुस्तकात इंदिरा गांधी यांच्याशी झालेली त्यांची पहिली ओळख, हिंदी भाषा शिकण्याचे प्रयत्न, साडी परिधान करणे, भारतीय खाद्यसंस्कृती स्वीकारणे आणि गांधी कुटुंबातील जीवनाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया यांचा उल्लेख आहे.
कुटुंबावर कोसळलेले दु:खद आघात
या आत्मचरित्रात गांधी कुटुंबाला हादरवून टाकणाऱ्या घटनांचाही सविस्तर उल्लेख आहे. राजीव गांधी यांचे धाकटे बंधू संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या निधनानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मात्र, सात वर्षांनंतर प्रचारादरम्यान त्यांचीही हत्या करण्यात आली. राजकारणापासून हळूहळू दूर गेल्यानंतर जेव्हा त्यांनी मागे वळून आपल्या आयुष्याकडे पाहिले, तेव्हा संपूर्ण जीवनप्रवासात असलेला ‘प्रेम आणि निष्ठेचा धागा’ अधिक स्पष्टपणे जाणवू लागला, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
राजकारण, सत्ता आणि सार्वजनिक जीवन
या आत्मचरित्रात अनेक वर्षे राजकारणात येण्यास विरोध केल्यानंतर सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवेशाची कहाणीही आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या नेत्या म्हणून त्यांचा राजकीय प्रवास आणि २००४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधानपद स्वीकारण्यास त्यांनी दिलेला नकार, याचाही पुस्तकात उल्लेख आहे.
गेल्या सहा दशकांत भारतात झालेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे आत्मचरित्र भारताकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते, असे गांधी यांनी म्हटले.


