बंगळुरू : चिक्कबनावरा परिसरात घडलेल्या या खूनप्रकरणात जीव गमवावा लागलेल्यांत पती अभिनंदन (३५) आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी खळबळ माजवणारे हे दुहेरी खूनप्रकरण उघडकीस आले. अभिनंदन आणि त्यांचा मुलगा घरात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले. सुरुवातीला पत्नीने पोलिसांना फोन करून, झोपेतून उठल्यानंतर पती आणि मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे सांगितले. आणि ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एकूण प्रकार उघडकीस आला. आणि चिक्कबनावरा परिसरात खळबळ माजली.
पोलिसांच्या चौकशीत हत्येचा उलगडा
उत्तर-पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त डी. के. नागेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पत्नी हरिणीचा या घटनेत सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार किरकोळ कारणांवरून वाद होत होते. शुक्रवारी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हरिणीने पतीला ठार करण्याचा निर्णय घेत प्रियकर विनय कुमारची मदत घेतल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे.
रविवारी रात्री नातेवाईकांकडून घरी परतल्यानंतर अभिनंदन आणि त्यांचा मुलगा झोपले. त्यानंतर हरिणी आणि विनय कुमार यांनी अभिनंदन यांचा श्वास गुदमरून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलाने घटना पाहिली अन्...
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यादरम्यान चार वर्षांचा मुलगा जागा झाला आणि त्याने हा प्रकार पाहिला. घटनेचा पुरावा मागे राहू नये, या उद्देशाने संशयितांनी मुलाचीही श्वास गुदमरून हत्या केल्याचा आरोप आहे.
मृतांच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा किंवा चाकूच्या वाराच्या खुणा आढळल्या नव्हत्या. मात्र, तपासातून दोघांचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.
पत्नीच्या पूर्वीच्या संबंधांचाही उल्लेख
अभिनंदन यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, हरिणी सुमारे वर्षभरापूर्वी विनय कुमारसोबत घरातून पळून गेली होती. मात्र, दोन महिन्यांनी ती परत आली. त्यानंतरही अभिनंदन यांनी तिला पुन्हा घरात स्वीकारले होते. मात्र, पती-पत्नीमधील वाद सुरूच होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडाचा पुढील तपास बंगळुरू पोलिसांकडून सुरू आहे. खूनप्रकरणात एका चिमुकल्यासहीत दोघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.