पणजी : यूपीए सरकारने २०१३ मध्ये एसटी समाजासाठी राजकीय आरक्षणाचा कायदा आणला होता. देशातील अन्य राज्यांनी हा कायदा वापरून स्थानिक एसटी समाजाला राजकीय आरक्षण दिले. मात्र मागील १३ वर्ष गोव्यातील भाजप सरकारने या कायद्याची अंमलबजावणी न करता येथील एसटी समाजावर अन्याय केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
गुरुवारी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कार्लूस फेरेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दीन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चोडणकर यांनी सांगितले की, यूपीए सरकारने केलेल्या कायद्यानुसार एसटी समाजाची लोकसंख्या अधिक असणाऱ्या राज्यात राजकीय आरक्षण देता येते. मात्र भाजप सरकारने असे न करता येथील एसटी समाजाला वंचित ठेवले. मागील काही वर्षे भाजप सरकार नवीन कायदा आणल्याचे सांगत आहे. मात्र अद्याप याबाबत एसटी समाजामध्ये संभ्रम आहे. गोवा सरकारने अर्थसंकल्पामध्ये एसटी ओबीसी समाजासाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे. मात्र हा निधी समाजावर खर्च केला जात नाही. या निधीचे काय केले जाते याचे उत्तर सरकारने देणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, राजीव गांधी यांनी देशात संगणकीकरणाला सुरुवात केली. आज आयटी क्षेत्रात देश आघाडीवर आहे. याचा पाया राजीव गांधी यांनी घातला होता. भाजप नेहमीच प्रतिगामी पक्ष होता आणि आहे. राजीव गांधी यांनी आयटी धोरण आणल्यावर संसदेत आणि बाहेर भाजपने याला प्रचंड विरोध केला. मात्र या आयटी क्रांतीचा दुरुपयोग आज भाजपच सर्वाधिक करताना दिसत आहे. समाज माध्यमातून खोटे संदेश पसरवणे, मोर्फड व्हिडिओ इमेजीस तयार करून लोकांमध्ये गैरसमज करण्याचे काम भाजप करत आहे.
भाजपच्या आशीर्वादानेच ड्रग्स व्यवसाय
चोडणकर म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याआधीच रसातळाला गेली आहे. गांजा शाळा महाविद्यालय आणि आता कोलवाळ तुरुंगातही पोहोचला आहे. देशातील इतर राज्यांच्या पोलिसांना गोव्यात ड्रग्स सापडतात. मात्र गोवा पोलिसांना ते सापडत नाहीत हे आश्चर्य आहे. भाजप नेत्यांच्या आशीर्वादानेच गोव्यात ड्रग्स व्यवसाय सुरू आहे.
कॉंग्रेस सरकारने दिली दोनच कॅसिनोंना परवानगी : सार्दिन
फ्रान्सिस सार्दीन म्हणाले की, कॅसिनोंची सुरुवात काँग्रेस काळात झाली असली, तरी आम्ही केवळ दोन ते तीन कॅसिनोंनाच परवानगी दिली होती. यामागे पर्यटन आढावा असा आमचा हेतू होता. आज मात्र सगळीकडेच कॅसिनो दिसू लागले आहेत.


