पणजी : मागील काही वर्षांत राज्यात विकासाची अनेक कामे झाली आहेत. २०१२ नंतर झालेला गोव्याचा विकास छायाचित्रांमधून दाखवावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छाया पत्रकार संघटनेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे संचालक अभीर हेदे, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, संदीप देसाई, अतिश नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी संघटनेतर्फे आयोजित छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात २०१२ नंतर विकासाची अनेक कामे झाली आहेत. विविध रस्ते, पूल, महामार्ग बांधण्यात आले आहेत. मोप लिंक रोड देशातील उड्डाण पुलातील एक आदर्श आहे. अनेकदा एखादी गोष्ट सतत पाहिल्याने आपल्याला त्याचे तेवढे महत्व राहत नाही. छायाचित्रांमध्ये शब्दांपेक्षा जास्त ताकद असते. हे दृश्य माध्यम असल्याने अधिक प्रभावी आहे.
यामुळेच २०१२ पूर्वीचा गोवा कसा होता आणि आताचा गोवा कसा आहे हा फरक छायाचित्रांतून दाखवणे आवश्यक आहे. यामुळे लोकांना जुना आणि नवीन गोवा छायाचित्रातून स्पष्ट होईल.
ते म्हणाले, वृत्तपत्रात देखील छायाचित्रांचे महत्त्व अधिक आहे. एका छायाचित्रावरून सर्व बातमी समजून येते. अनेकदा समाज माध्यमांवरील छायाचित्रे देखील प्रभावी ठरतात. छायाचित्रण एक कला आहे. तिचा योग्य वापर केल्यास एक छायाचित्र हजार शब्दांपेक्षा जास्त ताकदीचे ठरू शकते. संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे लहान मुलांमध्ये छायाचित्रणाची आवड वाढण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री पदाचा ताबा घेतल्यापासून आम्ही पत्रकारांसाठी विविध योजना राबवत आहोत. यामध्ये कोणतीही काटकसर करण्यात आलेली नाही. नोव्हेंबर पर्यंत काही योजनांमध्ये प्रस्तावित बदल करण्यात येणार आहेत.


