अली खान हत्या प्रकरण: चार संशयितांना सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

मडगाव येथील घोगळ मशिदीच्या वादातून झालेल्या सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या खूनप्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने अल्लाउद्दीन शाह सय्यदसह चारही संशयितांना ठोस पुराव्यांअभावी सशर्त जामीन मंजूर केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
17 mins ago
अली खान हत्या प्रकरण: चार संशयितांना सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

मडगाव : येथील घोगळ परिसरातील मशिदीच्या वादातून झालेल्या सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या खूनप्रकरणात दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने चार संशयितांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश शर्मिला ए. पाटील यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने संशयित अल्लाउद्दीन शाह सय्यद, मेहबूब मकानदार, सरताज ऊर्फ ताज अब्दुल्ला मकानदार आणि रिझवान शहा सय्यद या चौघांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

कोर्टाची निरीक्षणे आणि तपास यंत्रणेचे अपयश

गेल्या ३० जानेवारी रोजी घडलेल्या या हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, आरोपपत्रातील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांची सखोल पडताळणी केली असता, हे संशयित हत्येच्या कटाचे मुख्य सूत्रधार होते किंवा त्यांचा प्रत्यक्ष हत्येत सक्रिय सहभाग होता, हे दर्शवणारे कोणतेही प्रथमदर्शनी ठोस पुरावे पोलिसांना सादर करता आलेले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

विशेषतः रिझवान शहा सय्यद हा हत्येचा सूत्रधार असल्याचे किंवा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असल्याचे दर्शवणारे पुरावे पटवून देण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. शिवाय, तो फरार होता हा पोलिसांचा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले कागदोपत्री पुरावेही न्यायालयात सादर केले गेले नाहीत. या सर्व कायदेशीर त्रुटी आणि पुराव्यांचा अभाव विचारात घेऊन न्यायालयाने चारही संशयितांना जामीन मंजूर केला.

कठोर अटी व शर्तींखाली जामीन

न्यायालयाने चारही संशयितांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि २५ हजार रुपयांचे दोन जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा निर्णय दिला आहे. जामिनादरम्यान संशयितांनी न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यांमध्ये छेडछाड न करणे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे अनिवार्य करण्यात आले आहे. संशयितांचे पासपोर्ट असल्यास ते तत्काळ न्यायालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत संशयितांना घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशीद परिसरात जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपासासाठी बोलावल्यास सहकार्य करणे आणि संबंधित पोलीस ठाण्यात वेळेवर हजर राहणे संशयितांसाठी बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा