मीठ समजून टाकला डिटर्जंट! बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील शाळेत मध्यान्य भोजनात मिठाऐवजी डिटर्जंट पावडर दिल्यामुळे ३४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. सर्व बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आणि धोक्याबाहेर आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
मीठ समजून टाकला डिटर्जंट! बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा

नालंदा : बिहारच्या नालंदा येथील सरकारी मध्य शासकीय शाळेत मध्यान्य भोजनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवताना मिठाऐवजी चुकून डिटर्जंट दिल्यामुळे किमान ३४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेनंतर अचानक विद्यार्थ्यांच्या घशात जळजळ आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व बाधित बालकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत नेहमीप्रमाणे सुमारे १३२ विद्यार्थ्यांना 'एकता शक्ती फाउंडेशन'च्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातून तयार होऊन आलेले भोजन वाढण्यात आले होते. जेवणाच्या दुसऱ्या टप्प्यात एका विद्यार्थिनीने अतिरिक्त मिठाची मागणी केली. स्वयंपाकी असणाऱ्या महिलेने चुकून मिठाच्या पुड्याऐवजी डिटर्जंट पावडरचा पुडा काढून त्या विद्यार्थिनीच्या ताटात दिला. हे पाहून इतर मुलांनीही अतिरिक्त मिठाची मागणी केली आणि त्यांनाही तीच पावडर देण्यात आली. थोड्याच वेळात मुलांनी पोटदुखी व घशात त्रास होत असल्याची तक्रार केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.

शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला मुलांना कोमट मिठाचे पाणी देऊन प्रथमोपचार केले आणि त्यानंतर तातडीने भागन बिघा येथील दंत महाविद्यालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना बिहार शरीफ येथील सदर रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नालंदा जिल्हा प्रशासन, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बिहारचे मंत्री श्रवण कुमार यांनी रुग्णालयात पोहोचून मुलांच्या आरोग्याची पाहणी केली व डॉक्टरांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. सर्व ३४ विद्यार्थी (१७ मुले आणि १७ मुली) पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनाने अन्न नमुने तपासणीसाठी पाठवले असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा