प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षक महिलेकडे गांजा व चरससह मोबाईल व एटीएम कार्ड सापडली आहेत. संशयित सुरक्षारक्षक महिलेचे नाव आशा चोडणकर असून ती कारागृहात सेवा बजावत होती. संशयित महिलेकडून २३६ ग्रॅम गांजा, २ ग्रॅम चरस, तीन मोबाईल व तीन एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या परवानगीनंतर रात्री उशिरा तिला अटक करण्यात आली.
हा ड्रग्ज तस्करीचा प्रकार मंगळवार, १८ रोजी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आला. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील आयआरबी पोलिसांना तपासणीवेळी संशयित आशा चोडणकर या जीएचआरडीच्या सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्याकडे हा ड्रग्ज सापडला. चहाच्या थर्मासमधून कारागृहात हा मादकपदार्थ नेण्याचा प्रयत्न संशयित महिला करत होती. तपासणीवेळी सदर थर्मासमध्ये गांजा व चरस असल्याचे आढळून आले. संशयित महिलेला ताब्यात घेऊन कारागृह प्रशासनाने तिच्या लॉकरची तपासणी केली. तिच्या लॉकरमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यांची तीन एटीएम कार्ड आणि तीन मोबाईल फोन सापडले.
कोलवाळ पोलिसांकडून तपास सुरू
कारागृह प्रशासनाकडून सायंकाळी उशिरा कोलवाळ पोलीस स्थानकात या प्रकरणाची रितसर तक्रार दाखल करण्यात आली. जप्त केलेला ड्रग्ज आणि इतर वस्तूंसोबत संशयित महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध ड्रग्ज प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयाच्या परवानगीनंतर रात्री उशिरा तिला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.


