पणजी :गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहन हरमलकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित करण्याचा आदेश मेरशी येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या या प्रकरणात मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल, स्टिव्हन डिसोझा आणि समीर सातार्डेकर यांचाही समावेश आहे. याबाबतचे निर्देश विशेष न्यायालयाच्या न्या. विजया आंब्रे यांनी दिले.
जमीन हडप प्रकरणातून ईडीचा तपास
म्हापसा पोलिसांनी २०२२ मध्ये हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४२६/५ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी रोहन हरमलकरविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जमीन हडप प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन झाल्यावर हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४४४/८ मधील २,४५० चौरस मीटर जमिनीप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही गुन्ह्यांची दखल ईडीने घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान मनी लाँड्रिंगचा संशय आल्याने ईडीने पुढील कारवाई केली.
छापेमारीदरम्यान ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तांशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले. ईडीने रोहन हरमलकरला ३ जून २०२५ रोजी अटक केली होती. त्याचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला.
याचदरम्यान ईडीने हरमलकरने अल्कांत्रो डिसोझा आणि इतरांसह कट रचून मिळविल्याचा आरोप असलेली २१२.८५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. यात हणजूण, रेवोडा, नादोडा, कामुर्ली, पर्रा आणि बार्देश तालुक्यातील अन्य मालमत्तांचा समावेश आहे.
ईडीने रोहन हरमलकर, मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल, अल्कांत्रो डिसोझा, स्टिव्हन डिसोझा आणि समीर सातार्डेकर यांच्याविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात अल्कांत्रो डिसोझा याचे निधन झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सुनावणीदरम्यान हरमलकर आणि इतरांनी विक्री करार तसेच अन्य महत्त्वाचे दस्तऐवज बनावट पद्धतीने तयार केल्याचे पुराव्यांसह सादर करण्यात आले, असा युक्तिवाद ईडीतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी केला. न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेत रोहन हरमलकर, मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल, स्टिव्हन डिसोझा आणि समीर सातार्डेकर यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.


