वास्को : वास्को येथील प्रसिद्ध १२७व्या श्री दामोदर देवस्थानच्या भजनी सप्ताहाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यानिमित्त श्रीफळ श्री दामोदर देवाच्या चरणी अर्पण करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

उद्योजक प्रशांत जोशी यांच्याहस्ते श्रीफळ श्री दामोदराच्या चरणी ठेवण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दामोदराचे दर्शन घेतले. आणि भजन, ताळ-मृदुंगाच्या साथीने श्रींच्या गजरात भक्तिपूर्ण वातावरणात मंदिर परिसर भरून गेला.

श्रींच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. यावेळी वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर यांच्यासहीत इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या भजनी सप्ताहामुळे वास्को परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

आज संध्याकाळी, रात्री विविध मान्यवर गायक कलाकारांच्या ठरलेल्या ठिकाणी गायन बैठका होणार आहेत. त्यांनाही भाविक, श्रोत्यांची मोठी गर्दी असणार आहे. मध्यरात्री उशीरापर्यंत या गायन बैठका चालणार आहेत. उद्या दुपारी सप्ताहाची सांगता होणार आहे. मात्र, पुढील काही दिवस सप्ताहाची फेरी कायम असणार आहे.
श्री दामोदर देवाचे दर्शन घेण्यासाठी गोव्यातील कानाकोपरा तसेच शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील भाविकही गर्दी करणार आहेत. एकूण श्री दामोदर देवाच्या सप्ताहानिमित्त पुढील काही दिवस वास्को नगरात उत्सवी, उत्साही, भक्तीमय वातावरण कायम राहणार आहे. सप्ताहानिमित्त भरलेली फेरीही असणार आहे. त्यात लाखो रुपयांची उलाढाला होणार आहे.


