पणजी बाजारात नारळ @ ७० रुपये

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
पणजी बाजारात नारळ @ ७० रुपये

पणजी : आवक कमी झाल्याने पणजी बाजारात नारळाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. बाजारात  नारळाचे दर १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. सोमवारी बाजारात लहान नारळ ४० रुपये, मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये तर मोठा नारळ ६० ते ७० रुपये नग होता. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच नारळाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. श्री गणेश चतुर्थीच्या काळात नारळाचे दर आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

ऐन सणासुदीच्या दिवसांत नारळाचे दर भरमसाठ वाढल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे. गोमंतकीय खाद्यसंस्कृतीत नारळाशिवाय पानही हलत नाही. त्यातच श्रावण महिन्यातील सणासुदीचे दिवस असल्याने, जास्त नारळांची गरज असते. आज नागपंचमीच्या दिवशी पातोळ्या करण्यासाठीही नारळ लागतात. यापुढे रक्षाबंधन,  श्री गणेशचतुर्थी यासारखे सण येणार आहेत. श्री गणेशचतुर्थीला करंज्या व इतर खाद्यपदार्थ करण्यासाठी नारळ लागत असतात. त्यामुळे नारळाची किंमत वाढल्याने व यापुढे आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे. 

दरम्यान,  गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात अन्य बाजाराचे दर स्थिर होते. वालपापडीचे दर दर्जानुसार ८० ते १२० रूपये किलो होते. फ्लॉवर ५० रू. तर कोबी ४० रुपयांना होती. मिरची आणि ढब्बू मिरची प्रत्येकी १०० रुपये किलो दराने विकली जात होते. बटाटा ५० रुपये, कांदा ५० रुपये तर टॉमॅटो दर्जानुसार ४० ते ५० रुपये किलो होता. बाजारात गवारी ८० रुपये किलो होती. लहान वांगी ६० तर मोठी वांगी ८० रुपये किलो होती. गाजर, कारले आणि बीट प्रत्येकी ८० रू. किलो होते. तर दुधी भोपळा ५० रुपयेला नग होता.

बाजारात मटार १५० ते १८० रुपये किलो होते.  दोडका १०० रुपये तर भेंडी ८० रुपये किलो होती. आले २४० रू. तर लसूण २५० ते ४०० रुपये किलो होता. बाजारात पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मेथी ३० रू. तर शेपू ३० रुपये जुडी होती. पालक, तांबडी भाजीची एक जुडी प्रत्येकी २० रुपये होती. कोथिंबिरीचे दर कमी होऊन २० रुपये जुडी झाली.  सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी २५ रू. , कोबी २८ रू. ,फ्लॉवर ३० रू. एक नग, गाजर ४४ रू.,वालपापडी ६० रू., मिरची ४८, कांदा ४५ रू., बटाटा २७ रू. तर टोमॅटो २५ रुपये किलो होता. 

चिबुड २०० ते ३०० रुपये नग

पणजी बाजारात चिबुड दाखल झाले असून त्यांची किंमत आकारानुसार २०० ते ३०० रुपये आहे. निरफणस १५० ते ३०० रूपयेला विकले जात होते. मोठी भेंडी १०० रुपयांना ६ ते ७  नग होती. तर गावठी काकडी १०० रुपयांना ४ नग होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात पावसाळी भाज्यांचे प्रमाण कमी आहे.


हेही वाचा
सर्व पहा