मडगाव : राज्यात अत्याधुनिक फिल्मसिटी उभारण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. त्यानुसार खासगी गुंतवणूकदार तसेच इंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) योग्य जागेच्या शोधात आहेत. मात्र, अद्याप या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. एखादा खासगी गुंतवणूकदार स्वतःहून जागा घेऊन फिल्मसिटी उभारण्यासाठी पुढे आल्यास राज्य सरकारकडून त्याचे स्वागतच केले जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मडगाव येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी माहिती दिली. याच वेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या कन्येने केलेल्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला. प्रत्येकजण काही ना काही वक्तव्य करत असतो, अशा प्रत्येक वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणे शक्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित विविध समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बसणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी तत्काळ चर्चा करून त्या कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले जातील. आपत्कालीन परिस्थितीत आगीपासून संरक्षणासाठी कार्यालयात फायर हायड्रंटची सुविधा नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, ती सुविधाही त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खटले सुरू असल्याने काही पोलिसांच्या बदलीत अडचणी
राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधून पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघूनही त्यांना प्रत्यक्षात नवीन ठिकाणी पाठवले जात नसल्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती मांडली. काही पोलीस कर्मचाऱ्यांवर न्यायालयात खटले सुरू असल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवण्यात तांत्रिक अडचणी येतात. याव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही समस्या असल्यास त्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


