वझरी येथे घरावर भलेमोठे वडाचे झाड कोसळून मोठे नुकसान

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडून तातडीची आर्थिक मदत

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
16th August, 03:18 pm
वझरी येथे घरावर भलेमोठे वडाचे झाड कोसळून मोठे नुकसान

पेडणे : तालुक्यातील वझरी येथील शेट्ये कुटुंबाच्या घरावर भलेमोठे वडाचे झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर अचानक मोठे संकट ओढवले. दुर्घटनेची माहिती मिळताच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त शेट्ये कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओझरी येथे रात्रीच्या वेळी अचानक एक विशालकाय वडाचे झाड शेट्ये यांच्या घरावर कोसळले. झाडाची मोठी फांदी अन् बुंध्याचा भाग थेट घरावर पडल्याने छताचे व घराच्या भागाचे मोठे नुकसान झाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आवाज होताच परिसरातील स्थानिकांनीही मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच आमदार प्रवीण आर्लेकर यांनी तातडीने ओझरी गाठले. त्यांनी नुकसानग्रस्त घराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि शेट्ये कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबाला बसलेला आर्थिक फटका लक्षात घेऊन आमदार आर्लेकर यांनी शेट्ये कुटुंबाला तातडीने वैयक्तिक आर्थिक मदत दिली. केवळ प्राथमिक मदतीपुरते मर्यादित न राहता आगामी काळातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पीडित नागरिकांना वेळेत आधार मिळणे अत्यंत गरजेचे असते. शेट्ये कुटुंबावर संकट ओढवताच आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदतीचा हात पुढे केल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे महसूल यंत्रणेकडून योग्य मूल्यमापन करून सरकारी पातळीवरूनही बाधित कुटुंबाला त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा