साखळी : रस्त्यावर एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाल्याचे दिसताच आपला ताफा थांबवून स्वतः मदतीसाठी धावून जाण्याची संवेदनशीलता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली. शुक्रवारी, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी आमोणा पुलावर झालेल्या एका दुचाकी अपघातात जखमी झालेल्या युवतीची मुख्यमंत्र्यांनी विचारपूस करून तिला तातडीने उपचारासाठी इस्पितळात पाठवले.
सकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत साखळीहून पणजीकडे आपल्या ताफ्यासह जात असताना आमोणा पुलावर एक युवती दुचाकीसह रस्त्यावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः वाहनातून उतरून जखमी युवतीची विचारपूस केली.
या अपघातात युवतीच्या पायाला दुखापत झाली होती. तिची प्रकृती पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील एक वाहन बोलावले. त्यानंतर जखमी युवतीला त्या वाहनातून उपचारासाठी इस्पितळात पाठवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या आत्मियतेचे कौतुक
मुख्यमंत्री डॉ. सावंत हे राज्यात दौऱ्यावर असताना रस्त्यात एखादा अपघात किंवा जखमी व्यक्ती दिसल्यास अनेकदा आपला ताफा थांबवून मदतीसाठी पुढे सरसावतात. स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने वेळप्रसंगी जखमींची विचारपूस करून आवश्यक ती तातडीची मदत करण्यासाठी ते पुढाकार घेतात. आमोणा पुलावरील या घटनेमुळे उपस्थित नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेचे आणि माणुसकीपूर्ण भूमिकेचे कौतुक केले.


