सांगे पोलिसांशी वाद घालणाऱ्या पाच संशयितांना अंतरिम दिलासा

अटक झाल्यास जामिनावर सोडण्याचे आदेश

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
सांगे पोलिसांशी वाद घालणाऱ्या पाच संशयितांना अंतरिम दिलासा

मडगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश करणे तसेच पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी सांगे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी संशयित मेश्यू डिकॉस्टा, दत्ताराम राऊत देसाई, विराज नागेकर, प्रितानंद कुर्डीकर, सूरज बाळ्ळीकर यांना न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा दिला. अटक झाल्यास जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.

सांगे पोलिसांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते मेश्यू डिकॉस्टा, दत्ताराम राऊत देसाई, विराज नागेकर आणि इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अनेक गंभीर आणि अजामीनपात्र कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. सांगे येथील पोलीस उपनिरीक्षक कृष्णदीप बोरकर यांच्याशी झालेल्या वादावादीत आणि सांगे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश करून सरकारी सेवकांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. संशयितांच्या शोधासाठी त्यांच्या घरी पोलीसही गेले होते, पण ते सापडले नव्हते. संशयितांनी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी पाचही संशयितांचे अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले.

सांगे पोलिसांनी, १३ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचार्‍याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव, सरकारी कर्मचार्‍याच्या कामात अडथळा आणणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी अटक करू नये, यासाठी संशयितांनी न्यायालयात धाव घेतली होती. संशयितांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, संशयितांवर लावलेली सर्व कलमे ही सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची आहेत. तसेच पोलिसांनी संशयितांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे त्यांना अटकेची भीती आहे. संशयित तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

संशयितांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने संशयितांनी सांगे पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करावे. पोलीस बोलावतील त्यावेळी हजर राहणे, तक्रारदार किंवा साक्षीदारांशी प्रत्यक्ष, फोन किंवा सोशल मीडियाद्वारे कोणताही संपर्क साधू नये. साक्षीदारांना किंवा तक्रारदाराला कोणत्याही प्रकारे धमकावू नये. पोलिसांनी अटक केल्यास प्रत्येकी दहा हजारांचा वैयक्तिक बाँड व तेवढ्याच रकमेचा हमीदार सांगे पोलीस निरीक्षकांसमोर सादर करून जामिनावर मुक्त करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. मडगाव सत्र न्यायालयात होणार आहे.

न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व पाचही अटकपूर्व जामीन अर्जांवर एकत्र सुनावणी घेतली. संशयितांना न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत १७ ऑगस्टपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून सांगे पोलिसांना नोटीस बजावली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा