संजय सोनीचे बहरीन किंगडमचे वाणिज्यदूत अधिकार काढले

परराष्ट्र मंत्रालयाची कारवाई : दारूगोळ्याची बेकायदेशीरपणे आयात प्रकरण

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
10th August, 11:56 pm
संजय सोनीचे बहरीन किंगडमचे वाणिज्यदूत अधिकार काढले

पणजी : दारूगोळ्याची बेकायदेशीरपणे आयात केल्याप्रकरणी वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी यांच्यावर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने कारवाई केली आहे. मंत्रालयाने बंगळुरू येथील बहरीन किंगडमचे वाणिज्यदूत म्हणून सोनी यांना मिळालेले अधिकार काढून घेतले आहेत. यासंदर्भातील आदेश मंत्रालयाचे उप-शिष्टाचार प्रमुख विपुल पवार यांनी जारी केला आहे.
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा खात्याला ‘ह्युज प्रेसिझन’ कंपनी विदेशातून बेकायदेशीररीत्या दारूगोळा आयात करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दाबोळी विमानतळावर कंपनीने आयात केलेल्या मालाची तपासणी करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी कंपनीने १८ लाख ३२ हजार ५०६ रुपयांचा माल आयात केल्याचे आढळले. तसेच ७ जून २०२५ रोजी ९२ लाख ८३ हजार ४५९ रुपयांचा माल आयात करून कंपनीत साठवून ठेवल्याचे तपासात समोर आले. डीआरआयने दोन्ही कन्साइनमेंट्स मिळून एकूण १ कोटी ११ लाख १५ हजार ९६५ रुपये किमतीचा माल जप्त केला. या प्रकरणी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी संजय सोनी आणि कंपनीचे लॉजिस्टिक्स मॅनेजर जयेश पांडुरंग शेट्ये यांना अटक करण्यात आली होती.
मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोघांची सशर्त जामिनावर सुटका केली होती. या आदेशाला डीआरआयने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन रद्द करून आरोपींना शरण येण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोनी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर ३ डिसेंबर २०२५ रोजी डीआरआयने दोघांना पुन्हा अटक केली. पुढे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली.
गृह खात्याने दिली मंत्रालयांना माहिती
संजय सोनी हे बंगळुरू येथील बहरीन किंगडमचे वाणिज्यदूत असल्याने डीआरआय आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून झालेल्या कारवाईची माहिती गृह खात्याने केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली होती. या माहितीची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने सोनी यांचे वाणिज्यदूत म्हणून असलेले अधिकार काढून घेण्याचा आदेश जारी केला.      

हेही वाचा
सर्व पहा