नार्वे येथील काळभैरव मंदिर चोरीप्रकरणी अट्टल चोराला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

नार्वे येथील श्री काळभैरव मंदिरात दानपेटी फोडून ५ हजार रुपये लांबवणाऱ्या अट्टल चोर सावळो कोरगावकर याला डिचोली पोलिसांनी कुठ्ठाळी येथून अटक केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
23 mins ago
नार्वे येथील काळभैरव मंदिर चोरीप्रकरणी अट्टल चोराला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

डिचोली: नार्वे येथील प्रसिद्ध श्री सप्तकोटेश्वर देवस्थान परिसरातील श्री काळभैरव मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी डिचोली पोलिसांनी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला गजाआड केले. देवस्थानच्या दानपेटीचे कुलूप तोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या या संशयिताचा माग काढून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सावळो रामनाथ कोरगावकर (रा. देऊळवाडा-धारगळ, पेडणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:१७ वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने श्री सप्तकोटेश्वर देवस्थानच्या परिसरात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर तेथील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे ५ हजार रुपयांची रोकड आणि नाणी चोरून नेली. या चोरीप्रकरणी देवस्थानचे सचिव मंदार माधव सूर्यराव सरदेसाई यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी डिचोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच डिचोली पोलिसांन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून संशयित आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. संशयित सावळो कोरगावकर हा धारगळ-पेडणे येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे तो कुठ्ठाळी येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:१० वाजेच्या सुमारास सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेला सावळो कोरगावकर हा अट्टल चोर असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विशेषतः धार्मिक स्थळे आणि देवस्थानांना लक्ष्य करून तेथील दानपेट्या फोडणे व रक्कम लांबवणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यापूर्वी २०१४-१५ मध्ये त्याने हणजूण पोलीस ठाण्याचे लॉकअप फोडून पलायन केल्याचीही नोंद आहे. पुढील सखोल तपास डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


हेही वाचा
सर्व पहा