क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० जणांना ७.३६ कोटींचा गंडा

पर्वरी येथील आशुतोष नाईकला ‘ईओसी’कडून अटक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 hours ago
क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० जणांना ७.३६ कोटींचा गंडा

पणजी : जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून नागरिकांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून राज्यातील सुमारे ३०० जणांना ७ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) पर्वरी येथील आशुतोष नाईक याला अटक केली. त्याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

डिचोली येथील एका महिलेने ईओसीत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २०२० ते २०२५ या कालावधीत पणजी आणि पर्वरी येथे मुख्य संशयित लविश चौधरी उर्फ नवाब अली (रा. मुझफ्फरनगर-उत्तर प्रदेश, सध्या दुबई) याने स्वतःला ‘बोटब्रो क्यूएफएस ट्रेड लिमिटेड’, ‘यार्कर कॅपिटल मार्केट्स’, ‘बोटाल्फा क्रोस मार्केट्स’ आणि ‘माईन क्रिप्टो’ या कंपन्यांचा संस्थापक असल्याचे भासवले. तसेच या प्रकरणात मुख्य संशयितासह संजीव कुमार, ब्रजेश कुमार (दोघेही रा. उत्तर प्रदेश व सध्या दुबई), उदय सिनारी, नीलेश नाईक (दोघेही रा. डिचोली), आशुतोष नाईक (रा. आल्त पर्वरी), सूरज कांदे (रा. मळा पणजी), विजयकांत नार्वेकर, सजेश नार्वेकर आणि विजय नायडू या १० संशयितांचा समावेश आहे. वरील संशयितांनी संबंधित कंपन्यांच्या धोरणांचा प्रचार केला आणि गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन तक्रारदारासह सुमारे ३०० जणांना ७ कोटी ३६ लाख ५७ हजार १६० रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. नंतर ही रक्कम त्यांना परत केली नाही. तक्रारीची दखल घेऊन ईओसीचे पोलीस अधीक्षक अर्शी आदील व उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१४, ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३१९(२), ३२०, ३६(२), ३४०(२), ६१(२) तसेच ‘गोवा ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायदा १९’चे कलम ३ व ५ आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २००२’चे कलम ६(ड) अंतर्गत गुन्हा नोंद केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास निरीक्षक राझाशद शेख यांच्याकडे वर्ग केला. या प्रकरणी तपास करून पर्वरी येथील आशुतोष नाईक या संशयिताला गुरुवारी अटक केली. त्यानंतर त्याला मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

गुंतवणुकीची रक्कम देण्यास नकार

गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन तक्रारदारासह सुमारे ३०० जणांना ७ कोटी ३६ लाख ५७ हजार १६० रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयितांनी गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास नकार देत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा
सर्व पहा