नास्नोळा सुरीहल्लाप्रकरणी संशयिताचे म्हापसा पोलिसांसमोर आत्मसमर्पण

रोड रेजवरून युवकावर केला होता सुरीहल्ला

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
39 mins ago
नास्नोळा सुरीहल्लाप्रकरणी संशयिताचे म्हापसा पोलिसांसमोर आत्मसमर्पण

म्हापसा पोलिसांनी अटक केलेला संशयित रवी नाईक.

म्हापसा : नास्नोळा येथे रोड रेजवरून झालेल्या सुरी हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रवी लक्ष्मण नाईक (४६, रा. पोवासांव, मयडे) याला म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. तर संशयित सूरज कसबे (२८, रा. मयडे व मूळ महाराष्ट्र) याला घटनेच्या दिवशीच अटक झाली होती. या घटनेत मंथन आगरवाडेकर (२५, रा. थिवी) हा जखमी झाला होता.
शुक्रवारी ३१ जुलै रोजी नास्नोळा येथील मुख्य रस्त्यावर ही घटना घडली होती. वाहन चालवताना संशयित रवी नाईक आणि पीडित मंथन आगरवाडेकर यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. या वादा दरम्यान आरोपी रवी नाईकने मंथनच्या कानशिलात मारत त्याला धक्काबुक्की केली. हा वाद सुरू असताना संशयिताने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यातील संशयित सूरज कसबे हा घटनास्थळी आला व त्याने थेट सुरीने मंथनवर वार केले. नंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला. हा सर्व घटनाक्रम घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये बंदीस्त झाला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याच दिवशी संशयित आरोपी सूरजला पकडून अटक केली होती. तर घटनेच्या दिवसापासून रवी नाईक हा फरार होता. संशयित सापडत नसल्याने गेले चार दिवस म्हापसा पोलिसांवर वाढता दबाव होता. त्यामुळे पोलिसांना आपली संशयिताला पकडण्यासाठी तपासचक्रे तीव्र करावी लागली होती. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच बुधवारी ५ ऑगस्ट रोजी संशयित रवी नाईक याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला रितसर अटक केली.
संशयिताविरोधात अनेक गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, रवी नाईक याच्याविरोधात म्हापसा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेत मारहाण, प्राणघातक हल्ला, पोलिसांवर हल्ला तसेच अमली पदार्थ तस्करीसह विविध स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद असून, यापूर्वीही त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा