लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून युवक पुराव्याअभावी निर्दोष मुक्त

पीडितेसह वडिलांची माघार; मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाचा निकाल

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
2 hours ago
लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून युवक पुराव्याअभावी निर्दोष मुक्त

पणजी : बार्देश तालुक्यातील १६ वर्षीय मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांनी आपल्या तक्रारीपासून माघार घेत न्यायालयात संशयिताविरोधात कोणतीही तक्रार नसल्याची साक्ष दिली, तर तिच्या वडिलांनी आपण खोटी तक्रार दाखल केल्याचे मान्य केले. यानंतर मेरशी येथील पाॅक्सो विशेष न्यायालयाने बार्देश तालुक्यातील २५ वर्षीय युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी २१ मार्च २०२५ रोजी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मुलगी अस्वस्थ वाटू लागल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. तक्रारीत डिसेंबर २०२४ दरम्यान बार्देश तालुक्यातील २५ वर्षीय संशयित युवकाने मुलीचे अपहरण करून तिला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित युवकाला अटक केली. मात्र, तपासादरम्यान पीडित मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला.
२९ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने संशयित युवकाला सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर ३ मे २०२५ रोजी पोलिसांनी पाॅक्सो न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. प्रथमदर्शनी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने २५ जुलै २०२५ रोजी संशयिताविरोधात आरोप निश्चित करत खटल्याची सुनावणी सुरू केली. सुनावणीदरम्यान संशयिताच्या वतीने अॅड. मायकल नाझारेथ यांनी बाजू मांडताना पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली नसल्याने संशयिताविरोधात आरोपांना कोणताही ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. उलटतपासणीत पीडित मुलीने संशयिताविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तिच्या वडिलांनीही आपण दिलेली तक्रार खोटी असल्याची कबुली न्यायालयात दिली.
संशयिताविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यास अपयश
पीडित मुलगी व तिच्या वडिलांच्या साक्षी, वैद्यकीय पुराव्यांचा अभाव आणि उपलब्ध नोंदींचा विचार करून संशयिताविरोधातील आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे संबंधित युवकाविरुद्धचे आरोप सिद्ध न झाल्याने मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.

हेही वाचा
सर्व पहा