४.३७ कोटींच्या अफरातफरीतून खरेदी केलेली १.२२ कोटींची मालमत्ता जप्त

हणजूण पोलिसांची कामगिरी : सुखा रेस्टॉरन्टमध्ये झाली होती अफरातफर

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
03rd August, 11:34 pm
४.३७ कोटींच्या अफरातफरीतून खरेदी केलेली १.२२ कोटींची मालमत्ता जप्त

म्हापसा : आसगाव येथील सुखा या रेस्टॉरन्टमध्ये ४.३७ कोटींची अफरातफर झाली होती. यात संशयित आरोपी गुलशन कुमार सिंग (रा. दिल्ली) याच्याकडून रकमेतून खरेदी केलेली १.२२ कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता हणजूण पोलिसांनी जप्त केली आहे. न्यायालयाच्या मान्यतेने पोलिसांनी मालमत्तेची जप्ती करणारी कारवाई केली आहे.
आसगाव येथील सुखा- द इंडियन प्लॅटर रेस्टॉरंटमध्ये झालेल्या ४.३७ कोटी रुपयांची अफरातफर झाली होती. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी कारवाई करत संशयित गुलशन कुमार सिंग (रा. दिल्ली) याने अपहाराच्या पैशातून खरेदी केलेली १.२२ कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केली आहे.
मे २०२५ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुखा-द इंडियन प्लॅटर सुकून हॉस्पिटॅलिटी कंपनीचे मालक शिवकरण सिंग यांनी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रेस्टॉरंटचे तत्कालीन व्यवस्थापक गुलशन कुमार सिंग याच्याविरुद्ध भारतीय न्या. सं.च्या कलम ३१४, ३१६(४), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतून त्याला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
तपासादरम्यान आरोपीने रेस्टॉरंटमधील बिलिंग नोंदींमध्ये फेरफार करून कंपनीचा निधी स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये वळवल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे कंपनीचे सुमारे ४.३७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पोलीस तपासात समोर आले.
तपास अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांनी आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला असता अपहारातील रकमेचा वापर दिल्ली व बिहारमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी, राहते घर बांधणे, सोन्याचे दागिने खरेदी तसेच कुटुंबीयांच्या खात्यांत पैसे हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील नाईक करीत आहेत. गुन्ह्यातून मिळविलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त करण्यासाठी भारतीय न्याय संहितेतील तरतुदींचा प्रभावी वापर झाल्याचे हे गोव्यातील महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर जप्ती
पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १०७ अंतर्गत म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी अर्ज मंजूर करून गुन्ह्यातून मिळविलेल्या मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी दिल्ली व बिहार येथे कारवाई करून संशयिताची मालमत्ता जप्त केली.
घर, दागिने, दुचाकी जप्त : या कारवाईत २०२४ मध्ये बांधलेले सुमारे १.२० कोटी रुपये किमतीचे घर, तसेच २.५ लाख रुपये किमतीची दुचाकी आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या मालमत्तेची विल्हेवाट लावता येऊ नये म्हणून ती सुरक्षित करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा