स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; अज्ञात फेसबुक युजर्सवर गुन्हा नोंद

भाविक, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; अज्ञात फेसबुक युजर्सवर गुन्हा नोंद

म्हापसा : ‘आमचे गोवा’ या फेसबुक पेजवर श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे भाविक आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी अज्ञात फेसबुक युजर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शिवोली येथील श्री स्वामी समर्थ परिवार मठाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या २९९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा आक्षेपार्ह टिप्पणींचा पोस्ट टाकणारा प्रकार २९ व ३० जुलै दरम्यान घडला होता.

श्री स्वामी समर्थ परिवार मठातर्फे शिवोली येथील मठाच्या आवारात श्री स्वामी समर्थांची २१ फूट उंच मूर्ती उभारली आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी २९ रोजी या मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे काही प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन केले होते. या वृत्तांकनाचा व्हिडिओ ‘आमचे गोवा’ या फेसबुक पेजवर टाकण्यात आला होता. त्यानंतर आठ अज्ञात युजर्सनी स्वामी समर्थांच्या दर्जाबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद टिप्पणी केली होती.

या प्रकाराच्या निषेधार्थ गुरुवार, ३० रोजी सायंकाळी श्री स्वामी समर्थांचे अनेक भाविक तसेच हिंदू संघटनांचे पदाधिकारी हणजूण पोलीस स्थानकात हजर झाले. त्यांनी पोलिसांत धार्मिक भावना दुखावणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. तसेच मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर आणि इतर तीन हिंदू संघटनांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

या आध्यात्मिक संतांविरुद्ध अपमानास्पद, उपहासात्मक आणि निंदनीय टिप्पण्या करणाऱ्या सात फेसबुक युजर्सची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली होती. संशयितांच्या टिप्पण्यांमुळे श्री स्वामी समर्थांची थट्टा झाली. भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि यामुळे जातीय सलोखा व सार्वजनिक शांतता धोक्यात येऊ शकते, असा आरोप करण्यात आला होता. या कथित टिप्पण्यांचे स्क्रीनशॉट्सही तक्रारीसोबत जोडण्यात आले होते. 

हेही वाचा
सर्व पहा