बांधकाम साहित्य चोरीप्रकरणात वेर्णा पोलिसांकडून दोघांना अटक

कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वर्णा पोलिसांनी कारवाई करत दोन लाखांचे साहित्य हस्तगत केले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
29th July, 02:28 pm
बांधकाम साहित्य चोरीप्रकरणात वेर्णा पोलिसांकडून दोघांना अटक

पणजी : वेर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे दोन लाख रुपयांच्या बांधकाम साहित्य चोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात वेर्णा पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांकवाळ येथील रहिवासी आणि कंत्राटदार मैबुब हवालदार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

 त्यांच्या तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून २० जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत वेर्णातील केसरव्हाळ हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या प्लॉट नंबर ७ मधून अज्ञात चोरट्यांनी विविध प्रकारचे बांधकाम साहित्य लांबवले होते. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये चाळीस एमडीएस मेटल शटरिंग प्लेट्स, साठ जॅक प्रॉप्स तसेच आठ, बारा आणि सोळा मिलिमीटरचे टीएमटी बार वेस्टेज यांचा समावेश होता, ज्याची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी होती.

या गुन्ह्याचा कसून तपास करत वेर्णा पोलिसांनी चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल संशयितांकडून यशस्वीरित्या जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुनित बाबदिन (३०, सध्या रा. रायबंदर, मूळ रा. बांदा जिल्हा, उत्तर प्रदेश) आणि सुनिल महंगू प्रसाद (३१, मूळ रा. बांदा जिल्हा, उत्तर प्रदेश, सध्या रा. शापूर-बांदोडा, फोंडा) या दोघांना अटक केली आहे. संशयित सुनील हा गेल्या पंधरा वर्षांपासून स्क्रॅप यार्ड चालवत असून पुनित हा गेल्या दीड महिन्यापासून एका स्क्रॅप यार्डमध्ये काम करत होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सामील आहेत का, याचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रिस्ले कार्वालो यांच्यामार्फत केला जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा