सायबर विभागाची कारवाई : १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पणजी : सासष्टी तालुक्यातील एका महिलेला जास्त परताव्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने ईब्राहीम बातीश (३५, बंगळुरु) याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली.
सायबर विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला फेसबुकवरील गुंतवणुकीची जाहिरात पाहिल्यानंतर ४४७८९९७२४५९८ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधण्यात आला व ‘सोशल व्हेंचर कॅपिटॅलिस्ट एआय ट्रेडिंग’ हे अॅप डाउनलोड करण्यास सांगून सुरुवातीला अल्प रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर तिच्या खात्यात चुकून २० हजार अमेरिकन डॉलर जमा झाल्याचे सांगून ती रक्कम परत करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानुसार तक्रारदार महिलेने कर्ज घेऊन वरील रक्कम जमा केली.
दरम्यान, संशयितांनी विविध कर, शुल्क आणि इतर कारणे सांगत महिलेकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ३३,७५ लाख रुपये उकळले. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर महिलेने सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला.
बँक खात्याच्या तपासातून संशयित अटकेत
तपासादरम्यान फसवणुकीतील काही रक्कम बंगळुरूतील एका बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत ते खाते ईब्राहीम बातीशच्या सूचनेनुसार उघडण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर विभागाने त्याला अटक करून गोव्यात आणले. सुरुवातीची ३ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.