Home >> गुन्हे >> मडगावातील कथित अपहरणप्रकरणी दोघे संशयित कारवारमधून ताब्यात

मडगावातील कथित अपहरणप्रकरणी दोघे संशयित कारवारमधून ताब्यात

कौटुंबिक वादातून प्रकार घडल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
29 mins ago
मडगावातील कथित अपहरणप्रकरणी दोघे संशयित कारवारमधून ताब्यात

मडगाव : येथील डॉ. सतीश कुडचडकर यांचा मुलगा संजील याच्या कथित अपहरण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. याप्रकरणी पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहरण प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित सशील बिन मसूद (रा. मायना कुडतरी, मूळ हैदराबाद) व शाह अली सौदागर (रा. दवर्ली, मूळ सोलापूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

डॉ. सतीश कुडचडकर यांचा पुत्र संजील कुडचडकर याचे भरदिवसा अपहरण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. यानंतर पोलिसांचीही तपासकार्यात धावपळ झाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरणासाठी वापरलेली कार आणि त्यातील संशयितांचा कारवार कर्नाटक येथे शोध घेतला.

पोलीस अधीक्षक टिकम सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रथमदर्शनी कौटुंबिक वाद असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचा कसून तपास करत आहेत. कथित अपहरणाचा हा प्रकार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेला असून सीसीटीव्ही फुटेजनुसार एक महिला व आणखी दोघेजण संजील याला जबरदस्तीने कारमध्ये घालून नेताना दिसत आहेत. संजील कुडचडकर याच्या मुलीच्या तक्रारीनंतर मडगाव पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातील कारसह दोघा संशयितांना मडगाव पोलिसांनी कारवार येथे शोधून त्यांना ताब्यात घेतले. संजील याच्या पत्नीलाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येईल. यानंतर या प्रकारामागे कोणता उद्देश होता याची माहिती मिळेल. कारमध्ये संजील कुडचडकर, त्याची पत्नी व दोघे अनोळखी व्यक्ती अशा चार व्यक्तीच होत्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाईल. पुढील तपासाअंती या प्रकारामागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली. 

हेही वाचा
सर्व पहा