Home >> गुन्हे >> पालकांमधील वादाचा फटका मुलाला नको!

पालकांमधील वादाचा फटका मुलाला नको!

उच्च न्यायालय : मुलाला आईसोबत कॅलिफोर्नियाला आजीकडे जाण्यास मंजुरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24 mins ago
पालकांमधील वादाचा फटका मुलाला नको!

पणजी : पालकांमधील कौटुंबिक वादाचा फटका अल्पवयीन मुलाला बसू नये आणि मुलाचे कल्याण हेच न्यायालयाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे स्पष्ट करत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सात वर्षीय मुलाला आईसोबत अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आजीकडे सुट्ट्या घालवण्यासाठी जाण्याची परवानगी दिली. याबाबतचा आदेश न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी दिला.

मुलाच्या ताब्यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आईने मुलाला २३ जुलै ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अमेरिकेत नेण्याची परवानगी मागितली होती. आई-वडील दोघेही अमेरिकन नागरिक असून ओसीआय कार्डधारक आहेत व सध्या गोव्यात वास्तव्यास आहेत. मुलाला आजी, मावशी आणि चुलत भावंडांना भेटण्यासाठी कॅलिफोर्निया येथे घेऊन जाण्याची परवानगी आईने मागितली होती. मात्र, आई मुलाला अमेरिकेत नेऊन तेथेच कायमस्वरूपी राहू शकते आणि भारतीय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत वडिलांनी या अर्जाला विरोध केला.
आईने यापूर्वीच भारतीय न्यायालयांचे अधिकारक्षेत्र मान्य केले असून, मुलाच्या ताब्याचा खटला अद्याप प्रलंबित असल्याची नोंद न्यायालयाने घेतली. पालकांतील मतभेदांमुळे मुलाचा आनंद हिरावून घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने मुलाच्या इच्छेनुसार २३ जुलै ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आईसोबत अमेरिकेतील आजीच्या घरी जाण्यास परवानगी दिली. याशिवाय न्यायालयाने इतर अटी लागू केल्या आहेत.
मुलाची इच्छाही विचारात
सुनावणीदरम्यान न्यायालयाने १६ जून २०२६ रोजी मुलाशी वैयक्तिक संवाद साधला. यावेळी मुलाने कॅलिफोर्नियातील आजीकडे जाऊन सुट्ट्या घालवण्याची, बागकाम करण्याची आणि कुटुंबीयांना भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा संदर्भ देत न्यायालयाने मुलाच्या इच्छेसह त्याच्या सर्वांगीण हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

हेही वाचा
सर्व पहा