गंभीर जखमी तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक

दोडामार्ग : माटणे काटा, दोडामार्ग येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात मये-डिचोली येथील दुचाकीस्वार दीपक हरमलकर (४५) या युवकाचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांवर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत.
या अपघातात जखमींमध्ये गणो लक्ष्मण उसपकर (२५, रा. मये डिचोली), जयराम शिरोडकर (३८, रा. माटणे) व रामा गवस (२४, वजरे दोडामार्ग) यांचा समावेश आहे. गणो व जयराम यांच्यावर गोमेकॉत तर रामा याच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हा अपघात बुधवारी सायं. ४.३० च्या दरम्यान दोडामार्ग ते आयी मार्गावर घडला. अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी या विरोधी दिशेने येत होत्या. घटनास्थळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात स्कुटरवर मागे बसलेले दीपक हरमलकर हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गणो उसपकर हा गंभीर जखमी झाला. तर मोटारसायकलस्वार जयराम शिरोडकर व रामा गवस हे देखील गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही दुचाकींची मोठी मोडतोड झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. तसेच मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी इस्पितळमध्ये पाठवून दिला आहे. अपघाताची बातमी समजताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
स्थानिकांची मदत
अपघात घडताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नंतर रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना पुढील उपचारार्थ म्हापसा जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले. जिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी जखमींवर उपचार केले व प्रकृती गंभीर असलेल्या वरील दोघांना गोमेकॉमध्ये पाटवण्यात आले.