साडेतीन लाखांची सोनसाखळीही जप्त : तीन दिवस पोलीस कोठडी

मडगाव : मडगाव येथील ज्वेलर्स दुकानातून ऑनलाईन पेमेंटचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून ३ लाख ५६ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेण्याचा प्रकार घडला होता. मडगाव पोलिसांनी संशयित आदित्य विनोद गायकवाड (२२, रा. पुणे) याला पुणे पोलिसांच्या सहकार्याने अटक केली. तसेच चोरीची सोनसाखळीही जप्त केली. संशयिताला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगावच्या न्यू मार्केटमधील श्री साई ज्वेलर्सचे मालक प्रीतम बांदोडकर यांनी या चोरी प्रकरणी तक्रार नोंदवली होती. संशयित आदित्य गायकवाड हा दुकानात ग्राहक म्हणून आला होता. त्याने दुकानातून ३.५६ लाख किमतीची सोन्याची साखळी खरेदी केली. पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्याने मोबाईलवर बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाल्याचा बनावट स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवला. त्यानंतर संशयित बनावट स्क्रीनशॉट दाखवून सोन्याची साखळी घेऊन पसार झाला. मात्र, काही वेळाने ज्वेलर्स मालकाने बँक खाते तपासले असता त्यात कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली. मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. तांत्रिक देखरेख व उपलब्ध पुराव्याच्या माध्यमातून संशयित पुणे येथे असल्याचे समजले. त्यानुसार पुणे पोलिसांच्या सहकार्याने मडगाव पोलिसांनी संशयित आदित्य गायकवाड याला अटक केली.
पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी सांगितले की, संशयित आदित्य गायकवाडला अटक केली असून त्याच्याकडून २२.३२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्त केली. या संशयितावर सातारा सिटी पोलीस व खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. संशयिताला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचेही स्पष्ट केले.