Home >> गुन्हे >> तेमवाडा-मोरजीतील २३ बांधकामांवर कारवाईच्या आदेशामुळे स्थानिक चिंतित

तेमवाडा-मोरजीतील २३ बांधकामांवर कारवाईच्या आदेशामुळे स्थानिक चिंतित

परिसरात भीतीचे वातावरण : कारवाईच्या निकषांबाबत प्रश्नचिन्ह

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th July, 11:37 pm
तेमवाडा-मोरजीतील २३ बांधकामांवर कारवाईच्या आदेशामुळे स्थानिक चिंतित

वकिलाचे मोडतोड केलेले वाहन.

पेडणे : तेमवाडा, मोरजी येथील सर्वे क्र. ११६/३ आणि ११६/३५ मधील २३ बांधकामांवर पाडकामाची कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिक आणि मच्छीमार समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या कारवाईच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ भूमिपुत्रांच्या घरांवरच कारवाई होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या मते, किनारपट्टी परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोमंतकीयांच्या घरांवर कारवाई होत असताना, बिगर गोमंतकीयांनी उभारलेल्या मोठ्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि गेस्ट हाऊसेसवर कारवाई होत नसल्याने दुहेरी निकष लावले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
‍या प्रकरणात जमीनमालक अनिल नाईक यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने १७ जुलैपासून कारवाई सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने २२ जुलैपर्यंत कारवाईचा अथवा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, तेमवाडा किनारपट्टीतील काही जमीन रशियन नागरिकांनी खरेदी केल्याच्या चर्चेनंतर पूर्वी स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. आता या संपूर्ण किनारी भागावर एका कॅसिनो व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकाची नजर असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, भविष्यात मोठा पर्यटन प्रकल्प उभारण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मोरजीचे सरपंच विलास मोरजे यांनी दिल्लीस्थित एका व्यावसायिकाने माहितीच्या अधिकाराखाली संबंधित माहिती मागवल्याची पुष्टी केली.

तेमवाडातील वादाला वेगळे वळण
न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जमीनमालक आणि त्यांचे वकील सर्वेक्षणासाठी घटनास्थळी गेले असता काही नागरिकांनी त्यांना अडवून मारहाण केल्याचा तसेच वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, स्थानिकांनीही जमीनमालक व इतरांविरोधात क्रॉस तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे तेमवाडा प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

हेही वाचा
सर्व पहा