६ जणांना अटक : दक्षिण गोव्यातील बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा

पणजी : दक्षिण गोव्यातून अमेरिकेतील नागरिकांना कर्ज देण्याच्या आमिषाने गिफ्ट कार्डच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने पर्दाफाश केला. या विभागाने दक्षिण गोव्यातील बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा टाकून मुख्य सूत्रधार विश्वदीपसिंह हरिसिंह जाधव (२९, गुजरात) याच्यासह ६ जणांना अटक केली. त्याच्याकडून ८ लाख रुपये किमतीचे ६ लॅपटाॅप, ६ हेडफोन, १ राऊटर, ६ अॅपल आयफोन आणि इतर एेवज जप्त करण्यात आले.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी बेकायदेशीर ऑनलाईन व्यवहार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीनुसार, अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिल पोवळेकर, हवालदार अनय नाईक, योगेश खांडेपारकर, कॉ. करोल ईब्राहीम, अक्षय वेर्लेकर व इतर पथकाने सदर ठिकाणी १६ जुलै रोजी छापा टाकला. पथकाने चौकशी केली असता, विश्वदीपसिंह हरिसिंह जाधव (२९, गुजरात) हा मुख्य सूत्रधार असून तो सदर कॉल सेंटर चालवत असल्याचे समोर आले. त्याचे कर्मचारी विशाल सिंग (२४,राजस्थान), हिमांशु प्रजापती (१९, गुजरात), त्रुशित सावंत (३९, महाराष्ट्र) मयूर सावंत (३६, महाराष्ट्र) आणि धनराज वलेरा (२४, गुजरात) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ लाख रुपये किमतीचे ६ लॅपटाॅप, ६ हेडफोन, १ राऊटर, ६ अॅपल आयफोन आणि इतर एेवज जप्त करण्यात आला.
निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी वरील संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
अमेरिकन नागरिकांना कर्जाचे आमिष
संशयित ‘पे डे’ या नावाच्या बनावट कर्ज कंपनीचे एजंट असल्याचे भासवत होते. त्यांनी विशेषतः अमेरिकेतील नागरिकांना टार्गेट केले होते. फोनवरून संपर्क करून त्यांना कर्ज आणि त्वरित पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि व्हेरिफिकेशन चार्जच्या नावाखाली त्यांच्याकडून ॲपल, मेसीज, ग्रीन डॉट मनीपॅक, रेझर गोल्ड आणि एक्सबॉक्स या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड खरेदी करून त्यांचे कोड पाठवण्यास सांगितले जात होते. अशाप्रकारे अनेकांकडून मोठ्या रकमा उकळण्यात आल्या आहेत.