सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरण : संशयितांवरही कारवाई नाही

म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल ब्रागांझा (२२) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. पोलिसांना त्या देशी कट्ट्याचे स्रोत शाेधणे तसेच सॅम्युअलला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवरही ठोस कारवाई करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.
सॅम्युअलने आपल्या राहत्या घरी ५ जून रोजी स्वत:वर गोळी झाडून आपले आयुष्य संपविले होते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झालेले ट्रोलिंग आणि पोलीस त्रासाला कंटाळून सॅम्युअलने देशी कट्टा पिस्तूलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. परंतु या घटनेला एक महिना उलटूनही मयताकडे ते पिस्तूल कुठून आले आणि त्याचा मूळ स्रोत काय होता, याचा शोध घेण्यात म्हापसा पोलिसांना यश आलेले नाही.
शवविच्छेदन अहवालातून सॅम्युअलच्या डोके, डोळा आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले होते. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. त्यानंतर स्थानिक व विविध संघटनांनी म्हापसा पोलीस स्थानकावर निषेध मोर्चा काढत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मृताचे कुटुंबीय आणि स्थानिक नेत्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता.
सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ व्हायरल करण्याबरोबरच सॅम्युअलला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुख्य संशयितांचा शोध घेणे, तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बेकायदेशीर शस्त्राचा स्रोत शोधण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या संथ तपास कार्यपद्धतीवर आता रहिवाशांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पोलीस अधीक्षकांचा अहवाल महत्त्वाचा
सॅम्युअल ब्रागांझा याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या आईने पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. याबाबतचा स्वतंत्र तपास पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे हे करत आहेत. येत्या काही दिवसांत ते हा चौकशी अहवाल आपल्या वरिष्ठांकडे सादर करणार आहेत. अधीक्षक कर्पे हे आपल्या अहवालात नक्की काय नमूद करतात किंवा या घटनेवर काय टिप्पणी करतात, यावरच आता एकंदरीत तपासाच्या गोष्टी अवलंबून असून या प्रकरणाची पुढील दिशा ठरण्यासही मदत होणार आहे.