होंडा पोलिसांकडून ट्रक जप्त : महाराष्ट्रात लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय

वाळपई : सत्तरी तालुक्यातील होंडा ग्रामपंचायत हद्दीतील सोनशी-ओवळीये परिसरात आकेशिया वृक्षांची मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात लाकूड वाहतूक करणारा एक ट्रक होंडा पोलिसांनी जप्त केला असून, संघटित लाकूडतोड आणि महाराष्ट्रात लाकूड तस्करी करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वन विभाग आणि पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
वाळपई वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्यामसुंदर गावस यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, चौकशीनंतर दोषींविरुद्ध वन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कामगारांच्या तात्पुरत्या झोपड्याही आढळल्या
घटनास्थळी पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात तोडलेले आकेशिया वृक्ष, उघडे पडलेले बुंधे तसेच रस्त्याच्या कडेला रचून ठेवलेले लाकडाचे ओंडके आढळून आले. परिसरात काही कामगारांनी तात्पुरत्या झोपड्या उभारून वास्तव्यास राहत दिवस-रात्र वृक्षतोड सुरू ठेवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे या भागात संघटित स्वरूपात लाकूडतोड आणि तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला असून, पोलिस व वन विभाग विविध पैलूंवर तपास करत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती वृक्षतोड
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात सातत्याने वृक्षतोड सुरू होती. याबाबत संबंधित विभागाला वारंवार माहिती देऊनही योग्य वेळी कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, संबंधित जमिनीच्या मालकाला हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी होंडा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तोडलेले लाकूड ट्रकमध्ये भरले जात असल्याचे आढळून आले आणि संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले.