माईण-कोरगाव येथे गव्याच्या धडकेने दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

Story: गोवन वार्ता । विशेष प्रतिनिधी |
11th July, 12:07 am
माईण-कोरगाव येथे गव्याच्या धडकेने दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

पेडणे : माईण-कोरगाव येथे शुक्रवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान गव्याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने जुलिया कट्टमणी ही महिला गंभीर जखमी झाली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जुलिया कट्टमणी या पेडण्याहून कोरगाव येथील माईण परिसरातील आपल्या घरी दुचाकीवरून जात होत्या. यावेळी अचानक शेजारील मळ्यातून एक गवा भरधाव वेगाने रस्त्यावर आला आणि त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, कोरगाव परिसरासह संपूर्ण पेडणे तालुक्यात गव्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या गवे रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वन विभाग व राज्य सरकारने गव्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत, अशी जोरदार मागणी मगोचे नेते राजन कोरगावकर आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली. 

हेही वाचा
सर्व पहा