संदीप सुवर्णा खून प्रकरण : संशयित अक्षता हिला पाच दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी

म्हापसा : कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या मालपे, उडुपी येथील संदीप सुवर्णा (४२) यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी अक्षता एम. के. उर्फ रूपश्री सी. (३५, रा. नंथूर मंगळूरू) हिला म्हापसा न्यायालयाने अतिरिक्त पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीपचे भाऊ आणि मित्रांनी वाईन स्टोअरवर संशयित महिलेला पाहिले व तिचा पाठलाग केल्याने मृत कोणत्या हॉटेलवर राहिला होता, हे उघडकीस येऊन या खुनाला वाचा फुटली.
गुरुवारी ९ रोजी कळंगुट पोलिसांनी संशयित आरोपी अक्षता उर्फ रूपश्री हिला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात उभे केले. तेव्हा न्यायालयाने तिला अतिरिक्त ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गेल्या ४ रोजी संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
दरम्यान, ३० जून रोजी पणजीतील कॅसिनोमधून संशयित महिलेसोबत संदीप हा कळंगुटला आला होता. तर त्याचे सहकारी असलेले भाऊ व मित्र हे आपल्या कळंगुटमधील आरक्षित हॉटेलवर परतले होते. संदीप त्या महिलेसोबत कोणत्या हॉटेलवर गेला होता, याची कल्पना फिर्यादी भाऊ चेतन सुवर्णा व इतरांना नव्हती. तर दुपारपासून संदीपचा फोन बंद येत होता. त्यामुळे ते संदीपचा शोध घेत होते. यावेळी ती कॅसिनोमध्ये ओळख झालेली आणि ज्याच्या सोबत संदीप होता. ती महिला एका वाईन स्टोअरवरून जाताना या गटाला दिसली. त्यांनी तिचा पाठलाग केला आणि ती फाल्कोन रिसॉर्टमध्ये गेली. संशयित महिला दारू घेण्यासाठी त्या वाईन स्टोअरवर आली होती.
फिर्यादी व त्याच्या सहाकाऱ्यांनी संदीप सुवर्णा हा कोणत्या खोलीत राहिला आहे, याची माहिती रिसेप्शनला विचारली. तसेच त्याचा फोन लागत नसल्याने आम्हाला खोलीवर न्या, अशी विनवणी केली. परंतु हॉटेल कर्मचाऱ्यांनी नकार देत त्यांना माघारी पाठवले.
रात्री ९.३० पर्यंत संदीपशी संपर्क होत नसल्याने हा गट पुन्हा त्या रिसॉर्टवर गेला आणि हॉटेल कर्मचाऱ्यांकडे पुन्हा विनंती केली. हॉटेल व्यवस्थापनाने खोली उघडली तेव्हा आतमध्ये संदीप मृतावस्थेत पडला होता. तर सदर संशयित महिला गायब होती. फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्यांना संशयित महिला वाईन स्टोअरवर दिसली नसती तर संदीप सुवर्णाला शोधायला या गटाला अजून काही वेळ खर्ची करावा लागणार होता. किंवा पोलिसांचा आधार घेण्याची पाळी त्यांच्यावर आली असती.
दरम्यान संदीप सुवर्णाचा खून करून पसार झालेल्या संशयित अक्षता एम. के. हिला शुक्रवारी ३ रोजी बंगळुरू येथे कळंगुट पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या सहाय्याने अटक केली होती. नंतर तिला त्याच दिवशी रात्री ट्राझिंट रिमांडवर गोव्यात आणले होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर हे करत आहेत.
झोपेच्या गोळ्यांचा अतिडोस दिल्याचा संशय
संशयित अक्षता पोलिसांना दिलेल्या जबाबात, स्वतःसाठी आणलेल्या झोपेच्या गोळ्या संदीपने चुकून घेतल्याचा दावा करत आहे. तसेच तो झोपल्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी घेऊन आपण निघून गेल्याचे तिने सांगितले आहे. मात्र, लुटमारीच्या उद्देशानेच तिने संदीपला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्याच्या अतिडोसमुळे मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.