इमारतीतील विक्री न केलेल्या फ्लॅट्सचे देखभाल शुल्क बिल्डरने भरावे!

सहकार लवादाचा निर्णय : बिल्डरला १९.७४ लाख भरण्याचा आदेश

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
23rd August, 11:33 pm
इमारतीतील विक्री न केलेल्या फ्लॅट्सचे देखभाल शुल्क बिल्डरने भरावे!

मडगाव : घोगळ येथील कुडतरकर लँडमार्क गृहनिर्माण संकुलातील ३९ न विकलेल्या युनिट्सचे थकीत देखभाल शुल्क विकासकाने भरावे, असा निर्णय सहकार विभागाच्या लवादाने दिला. त्यानुसार बिल्डरला एकूण १९ लाख ७४ हजार ७१६ रुपये थकीत देखभाल शुल्क अदा करावे लागणार आहे.
गृहनिर्माण संकुलातील या ३९ युनिट्समध्ये २२ फ्लॅट्स आणि १७ व्यावसायिक दुकानांचा समावेश आहे. थकीत रकमेवर प्रत्येक इनव्हॉईसच्या देय तारखेपासून वार्षिक १८ टक्के व्याज, तसेच लागू उशिराचे शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. कुडतरकर लँडमार्क को ऑपरेटिव्ह हाउसिंग मेंटेनन्स सोसायटीमध्ये सहा ब्लॉक्स असून एकूण २०७ युनिट्स आहेत. बिल्डरच्या ताब्यात असलेल्या ३९ न विकलेल्या युनिट्सचे अनेक महिन्यांपासून देखभाल शुल्क थकीत होते. त्यामुळे संकुलातील पायाभूत सुविधा आणि सामायिक सेवांचा खर्च भागविण्यात अडचणी येत असल्याचे सांगत सोसायटीने २४ एप्रिल २०२४ रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती.
दरम्यान, बिल्डरने आपल्या बचावात ही ३९ युनिट्स कुलूपबंद, रिकामी आणि वापरात नसल्याने त्यांच्यावर देखभाल शुल्क लागू होत नाही, तसेच मालमत्ता विकल्यानंतर देखभालीची जबाबदारी सुरू होते, असा दावा केला होता. मात्र, सहकार विभागाच्या लवादकांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला.
गोवा सहकारी संस्था नियमाचा संदर्भ देत लवाद अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, विक्री न झालेल्या युनिट्सचे मालक म्हणून बिल्डर किंवा विकासक त्यांचे देखभाल शुल्क भरण्यास जबाबदार आहेत. युनिट्स रिकामी किंवा कुलूपबंद असली तरी देखभाल शुल्काची जबाबदारी संपत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
इतर सोसायट्यांसाठी निर्णय ठरणार मार्गदर्शक
सोसायटीचे सचिव मार्क फर्नांडिस यांनी या निर्णयाचे स्वागत केले. बिल्डरला न विकलेल्या जागांच्या देखभालीची जबाबदारी टाळता येणार नाही, हे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारच्या वादांना सामोरे जाणाऱ्या इतर गृहनिर्माण सोसायट्यांसाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.            

हेही वाचा
सर्व पहा