अपघातात मुलगा गमावला, आईला ३६.८४ लाखांची भरपाई

मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचा निकाल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
22nd August, 10:48 pm
अपघातात मुलगा गमावला, आईला ३६.८४ लाखांची भरपाई

मडगाव : लोलये येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत पावलेल्या ३३ वर्षीय व्हॅलेंटाईन बार्रेटो या युवकाच्या आईला ३६ लाख ८४ हजार ७०० रुपये भरपाई मिळणार आहे. दक्षिण गोवा येथील मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाने यासंदर्भात आदेश दिले आहेत.

दक्षिण गोवा येथील मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य राम प्रभूदेसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. नुकसान भरपाईची रक्कम अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून ६.८० टक्के वार्षिक व्याजासह देण्याचे आदेश न्यायाधीकरणाने प्रतिवादींना दिले आहेत. अपघाताची घटना लोलये येथे घडली होती. अँथनी फर्नांडिस (२२, रा. पोळे, काणकोण) हा त्याची दुचाकी चालवत पोळेच्या दिशेने जात होता. त्यावेळी व्हॅलेंटाईन बार्रेटो हा त्याच्या दुचाकीवर मागे बसला होता. समोरून येणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना अँथनीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याशेजारील दगडावर आदळून दोघेही बाजूच्या झाडीत पडले. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने व्हॅलेंटाईनचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल दीपक गावकर यांनी दिलेल्या साक्षीनुसार, दुचाकी चालकाचा निष्काळजीपणा आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवणे अपघातास कारणीभूत ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा दाखला देत न्यायाधीकरणाने स्पष्ट केले की, मोटार अपघात दाव्यात फौजदारी खटल्यासारखे पुरावे सिद्ध करण्याची गरज नसते.

न्यायाधीकरणाने दुचाकी चालक अँथनी फर्नांडिस आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांना संयुक्तपणे ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, मडगाव येथील जिल्हा न्यायालयाच्या खात्यात एनईएफटीद्वारे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

मासिक उत्पन्नाचा विचार करून भरपाई

व्हॅलेंटाईन हा काणकोण येथील नॉर्बर्ट फिटनेस स्टुडिओमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून दरमहा २५ हजार रुपये पगारावर कार्यरत होता. न्यायाधीकरणाने त्याच्या मासिक उत्पन्नाचा विचार करून एकूण ३६ लाख ८४ हजार ७०० रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली. 

हेही वाचा
सर्व पहा