मडगाव : कोंब मडगाव येथील ५४ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून गुगल पे अॅपच्या माध्यमातून ७० हजार ८ रुपये अनधिकृतपणे दुसर्या बँक खात्यात वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुष्पा मडकईकर यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या एक तासाच्या कालावधीत तक्रारदार महिलेच्या संमतीशिवाय गुगल पे अॅपच्या माध्यमातून एकूण आठ अनधिकृत यूपीआय व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांतून त्यांच्या बँक खात्यातील ७०,००८ रुपये परस्पर दुसर्या बँक खात्यात वळविण्यात आले.
आपल्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर मडकईकर यांनी मडगाव पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मडगाव पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वदेश देसाई या सायबर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अनधिकृत यूपीआय व्यवहारांच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


