पणजी : मांडवी नदीत पूर्वी नांगरलेल्या ७० प्रवासी क्षमतेच्या एम. व्ही. ‘रॉयल फ्लोटल’ या जुन्या कॅसिनो बोटीचा परवाना पाच वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. परवाना १४ जून २०२६ ते १३ जून २०३१ या कालावधीसाठी नूतनीकरण करण्यात आला आहे. याची दखल घेत न्यायालयाने याचिकादाराला याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असून, डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनीला तीन आठवड्यांत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘इनफ इज इनफ’ संस्थेचे सदस्य स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, उदय भेंब्रे, सुदीप ताम्हणकर आणि हरीश मडकईकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत राज्य सरकार, कॅप्टन ऑफ पोर्ट आणि डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
मांडवी नदीत ७० प्रवासी क्षमतेचे जुने कॅसिनो जहाज हटवून त्याजागी तब्बल २ हजार प्रवासी क्षमतेचे मोठे जहाज नांगरण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कंपनी मांडवी नदीत नवीन कॅसिनो जहाज आणणार नसल्याची हमी देण्यात आली होती.
गृह खात्यानेही न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून नवीन कॅसिनो जहाजासंदर्भात कोणताही अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच भविष्यात जुन्या जहाजावरील परवाना नव्या जहाजावर हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्यास त्याची माहिती सर्वप्रथम उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले होते.
पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला
जुन्या जहाजाचा परवाना नव्या जहाजावर हस्तांतरित करण्याबाबत निर्णय झाल्यास तो प्रथम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. आता जुन्या ‘रॉयल फ्लोटल’चा परवाना नूतनीकरण झाल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली. यानंतर याचिकादाराने याचिकेत दुरुस्ती करण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून कंपनीला बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली. पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.


