पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणातील १७ वर्षीय पीडितेने आपल्या जबाबात संशयिताविरोधात काहीही बोलण्यास नकार दिला. तिच्या जबाबात विसंगतीही आढळून आली. तसेच, पीडितेच्या आईने पोलिसांच्या दबावाखाली येऊन तक्रार दाखल केल्याचा जबाब दिला. याशिवाय, संशयिताचा डीएनए पीडितेच्या गर्भाशी जुळत नसल्याचा वैद्यकीय अहवालही समोर आला. या सर्व बाबींची नोंद घेत मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने पुराव्याअभावी केपे तालुक्यातील २६ वर्षीय संशयिताची निर्दोष सुटका केली.
याबाबतचा आदेश न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.
कुडचडे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने २० सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, केपे तालुक्यातील २६ वर्षीय युवकाने १ मार्च ते ३० जून २०२५ या कालावधीत मुलीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. मुलीने केपे तालुक्यात आपल्या नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर केपे पोलिसांनी ११ आॅगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. त्यावेळी मुलीला मेरशी येथील अपना घरात ठेवण्यात आले होते. तेथे ती गरोदर असल्याचे समोर आले. तिची चौकशी केली असता, तिने सदर युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. याची दखल घेऊन कुडचडे पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक जॉयसी कार्व्हालो यांनी गुन्हा दाखल करून २२ सप्टेंबर २०२५ रोजी युवकाला अटक केली.
पीडित मुलीसह गर्भाचे डीएनए नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले. याच दरम्यान न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी संशयित युवकाला सशर्त जामीन मंजूर केला. तपास पूर्ण कुडचडे पोलिसांनी या प्रकरणी संशयित युवकाविरोधात पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयितातर्फे अॅड. ए. गावकर यांनी युक्तिवाद मांडला. पिडितेने आपल्या जबाबात संशयिताविरोधात काहीही बोलण्यास नकार दिला. तिच्या जबाबात विसंगती आढळून आली. याशिवाय पिडितेच्या आईने पोलिसांच्या दबावाखाली येऊन तक्रार दिल्याचा जबाब दिला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा
पीडितेच्या गर्भाचे आणि संशयित युवकाचे डीएनए नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात संशयिताचा डीएनए पीडितेच्या गर्भाशी जुळत नसल्याचे समोर आले. तसेच, पीडितेने न्यायालयातील जबाबात संशयिताविरोधात आरोप करण्यास नकार दिला. या सर्व बाबी आणि साक्षीतील विसंगती लक्षात घेऊन मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने पुराव्याअभावी युवकाची निर्दोष सुटका केली.


