इराणी नागरिकाचा जामीन अर्ज मंजूर; वैध व्हिसा सादर केल्यानंतरच सुटका

म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाचे निर्देश

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
10th August, 11:55 pm
इराणी नागरिकाचा जामीन अर्ज मंजूर; वैध व्हिसा सादर केल्यानंतरच सुटका

म्हापसा : वैध व्हिसाविना भारतात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या ३८ वर्षीय इराणी नागरिक हमीद झारसाव याला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, वैध व्हिसा सादर केल्यानंतरच त्याची सुटका करावी, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हणजूण पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी इमिग्रेशन आणि फॉरेनर्स कायद्यानुसार झारसाव याला अटक केली होती. तो शिवोली येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्याचा व्हिसा २८ जून २०२३ रोजी संपला असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. आरोपीच्या वकिलांनी त्याच्याकडे ३० एप्रिल २०२८ पर्यंत वैध असलेले यूएनएचसीआरचे निर्वासित कार्ड असल्याचे सांगत जामिनाची मागणी केली. मात्र, सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. त्यानंतर २० रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि स्थानिक हमीदाराच्या हमीनुसार जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने स्पष्ट केले की, जोपर्यंत आरोपी वैध व्हिसा सादर करत नाही, तोपर्यंत त्याची सुटका केली जाणार नाही. त्याला ऑनलाइन व्हिसासाठी अर्ज करण्यास मदत करण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने घातलेल्या अटी
सुटकेनंतर दोन आठवड्यांत एफआरआरओ, गोवा येथे नोंदणी करणे, निवासाचा पत्ता व उत्पन्नाच्या स्रोताची माहिती देणे, प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहणे आणि तपासात सहकार्य करणे, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. भारत सोडून जाणार नसल्याचे हमीपत्र इराणी दूतावासाकडून सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा