गोवन वार्ता गोवन वार्ता
पणजी : जास्त व्याजाचे आमिष दाखवून अनेकांना ‘ओरिस कॉईन’मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून सुमारे ३ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संशयित राहुल खुराना (दिल्ली), रवी ठाकूर आणि राहुल जाधव (महाराष्ट्र) यांच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात १,३०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ४३ साक्षीदारांचे जबाब नोंद आहेत.
मये-डिचोली येथील नीलेश अर्जुन कारबोटकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तरुण त्रिखा, राहुल खुराना, रवी ठाकूर आणि राहुल जाधव यांनी जास्त व्याजाचे आमिष दाखवून ऑनलाईन पद्धतीने ‘ओरिस कॉईन’मध्ये गुंतवणुकीस भाग पाडले. अनेकांनी १ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे २ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र वरील संशयितांनी ठरल्याप्रमाणे मोबदला दिला नाही आणि त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी ईओसीचे अधीक्षक अर्शी अादिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल परब याच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रवी ठाकूर मुंबईत आल्याची माहिती ईओसीला मिळाली. १३ मे रोजी संशयिताला गोव्यात आणून अटक केली. ईओसीच्या तपासात आणखी काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. सर्वांना मिळून संशयितांनी ३ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे दिसून आले. ईओसीने संशयित राहुल खुराना, रवी ठाकूर आणि राहुल जाधव यांच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात १,३०० पानी आरोपपत्र दाखल केले.


