काणकोण : गोव्यात सध्या भाजपविरोधी वातावरण असून गोव्याच्या जनतेला भाजपा नको झालेला आहे. भाजपाला हटविण्याकरिता युतीसाठी काँग्रेसतर्फे दारे खुली असून दोन दिवसांत गोवा फॉरवर्ड पक्षासोबत बैठक होईल, असे गोव्याचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
खोतीगाव पंचायतीचे माजी सरपंच तथा आदिवासी समाजाचे नेते दया उर्फ उमेश गावकर यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जनार्दन भंडारी, हर्ष देसाई, नवदीप फळदेसाई, मनीष नाईक गावकर, सिद्धार्थ गायक, प्रलय भगत, रुजारियो फर्नांडिस, किरण झोरे, दयानंद फळदेसाई, जेम्स आंन्द्रादे, जि. पं. सदस्य सुमित्रा पागी, उर्सिला कॉस्ता, प्रदेश महिला अध्यक्ष प्रतिषा खलप व इतर उपस्थित होते.
भाजप हा अदानी व अंबानींचा पक्ष असून गरिबांकरिता हा पक्ष काम करीत नाही. आदिवासींची मते भाजपला हवी आहेत. मात्र, त्यांना हक्क देण्याचे भाजप टाळत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
युरी आलेमाव यांनी भाजपवर टीका करताना आदिवासींसाठी ३ हजार २०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून येतात त्याचा गोवा सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी केली. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काणकोणसह गोव्यात काँग्रेसचे २७ आमदार निवडून येणार असल्याचा दावा केला. यावेळी जनार्दन भंडारी यांनी काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकरांवर टीका करताना रमेश तवडकर यांनी आदिवासी असल्याचे कार्ड वापरून स्वत:चा विकास करून घेतल्याचे सांगितले.
काणकोणचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. काँग्रेसकरिता सर्वोपरी कार्य करणार असून तळागाळात जाऊन काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे दया गावकर यांनी सांगितले.
यावेळी प्रतिषा खलप, दयानंद फळदेसाई, मनेश नाईक गावकर, गास्पर कुतिन्हो यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन वैष्णव पेडणेकर यांनी केले.


