पूर्ण राजकीय आरक्षण मिळेपर्यंत ‘उटा’ची चळवळ सुरूच

प्रकाश वेळीप : आंदोलनाबाबत रविवारी बैठकीनंतर निर्णय

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
08th August, 11:52 pm
पूर्ण राजकीय आरक्षण मिळेपर्यंत ‘उटा’ची चळवळ सुरूच

पत्रकार परिषदेत बोलताना ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप. सोबत इतर.

मडगाव : अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला विधानसभा निवडणुकीत पूर्ण राजकीय आरक्षण मिळेपर्यंत ‘उटा’च्या नेतृत्वाखाली चळवळ सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आगामी पाचवी निवडणूक आरक्षणाविना होऊ नये, यासाठी समाजाने एकजूट दाखवून आंदोलनाला वेग दिला आहे, अशी माहिती ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.
मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत वेळीप बोलत होते. यावेळी दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, जॉयसी डायस, प्रकाश गावकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना वेळीप यांनी सांगितले की, एसटी समाजाला २००३ मध्ये दर्जा मिळाल्यानंतर चार विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र, राजकीय आरक्षण मिळाले नाही. आता पाचवी निवडणूकही आरक्षणाविना जाऊ नये, यासाठी समाजातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे लढा दिला जात आहे.
एसटी समाजाला राजकीय आरक्षणासाठी अधिसूचना जारी होऊन राज्यात कायदा लागू झाला आहे. याबाबत उटातर्फे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानण्यात आले. आरक्षणाच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे वेळीप यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी दहा तालुक्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ४२५ बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त उटातर्फे रविवारी फर्मागुढी-फोंडा येथे बैठकीनंतर चळवळीची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली जाईल. निवडणुका जवळ आल्याने आरक्षण प्रक्रियेच्या पाठपुराव्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.
अडीच महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या बैठकीत पुढील अडीच महिन्यांत आरक्षणाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याचे आश्वासन मिळाल्याचे वेळीप यांनी सांगितले. ऑक्टोबरपर्यंत आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आगामी निवडणुकीत आरक्षित चार जागांवर एसटी समाजाचे उमेदवार विजयी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एसटी समाजाला कोणतीही गोष्ट संघर्ष, चळवळ केल्याशिवाय मिळालेली नाही. आरक्षणासाठीही समाजाच्या मुख्यमंत्र्यांसोबत व केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठका झाल्या होत्या. मतभेद विसरून समाज एकत्र आल्याने त्याचा फरक दिसू लागला आहे.
- प्रकाश वेळीप, अध्यक्ष, उटा      

हेही वाचा
सर्व पहा