पणजी : अनमोड घाटातील रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामाला विलंब होत आहे. यामुळे मालवाहतुकीला १०० ते १५० किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. वाहतूक खर्च वाढत आहे. याचा गोवा तसेच कर्नाटक मधील उद्योगांवर परिणाम होत आहे. याबाबत गोवा आणि बेळगाव या दोन्ही चेंबरने केंद्रीय खात्याकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षा (जीसीसीआय) प्रतिमा धोंड यांनी केले.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे (बीसीसीआय) आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. धोंड म्हणाल्या की, अनमोड घाटातील वाहतूक कोंडीमुळे बेळगावचे फाऊंडरी उद्योग आणि गोव्यातील प्रक्रिया उद्योगांमधील कच्चा माल, कृषी माल आणि नाशवंत वस्तूंच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होत आहे.
यासाठी राष्ट्रीय महामार्ग ४-एचे काम जलद गतीने पूर्ण करून, अवजड मालवाहतूक पूर्ववत सुरू करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यासह दोन्ही राज्य सरकारांकडे संयुक्त पाठपुरावा करणे आवश्यक आहे. गोवा बेळगाव आर्थिक कॉरिडोअर करण्यासाठी देखील दोन्ही चेंबरनी आपापल्या राज्य सरकारकडे बोलणी करणे गरजेचे आहे.
धोंड यांनी व्यापार, उद्योग आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या बेळगाव चेंबरच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या देदिप्यमान परंपरेचे कौतुक केले. चेंबरने राबवलेल्या बी-ई-एल-ई-एक्स २०२६ औद्योगिक प्रदर्शन, स्थानिक ट्रेड लायसन्स आणि ई-आस्ती आदी उपक्रम, अडचणी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, कामगार कायदा परिसंवाद, जीएसटी जागरूकता मोहीम तसेच महिला उद्योजक आणि पारंपारिक कारागिरांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची त्यांनी विशेष प्रशंसा केली. औद्योगिक विकासासाठी दोन्ही चेंबरने संयुक्त समन्वय समिती स्थापन करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.
खाजगी वाहनचालकांना विनाकारण त्रास नको
कर्नाटक आणि गोव्यादरम्यान प्रवास करणाऱ्या व्यापारी, नोकरदार आणि पर्यटकांच्या खाजगी वाहनांवर होणारी दंडात्मक कारवाई आणि सीमेवरील तपासणीच्या त्रासावरही धोंड यांनी चिंता व्यक्त केली. कायदेशीर प्रवाशांना त्रास होऊ नये आणि प्रशासकीय अडथळे दूर व्हावेत, यासाठी दोन्ही राज्यांच्या वाहतूक प्राधिकरणांचा समावेश असणारी डिजिटल क्लिअरन्स प्रणाली आणि संयुक्त तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.


