पणजी : गोव्यात वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या दोन परदेशी नागरिकांविरुद्ध मांद्रे पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
पहिल्या प्रकरणात, थायलंडची नागरिक इत्सारापोन फान्नाखेन (३८) हिला ५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.४० वाजता पेडणे तालुक्यातील आश्वे येथील ‘ला कॅबाना बीच अँड स्पा रिसॉर्ट’ येथे तपासादरम्यान वैध व्हिसाशिवाय भारतात वास्तव्यास असल्याचे आढळून आले. यासंदर्भात पोलीस निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांनी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय (FRRO), पणजी येथे दिलेल्या तक्रारीवरून इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायदा, २०२५ मधील कलम २३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात, रशियाचा नागरिक डेनिस फोमिनोव (४१) हा मांद्रे येथील गावडेवाडा परिसरात वैध पासपोर्ट व व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले. पोलीस निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्धही इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायदा, २०२५ मधील कलम २३(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मांद्रे पोलीस ठाण्याचे पीएसआय लक्ष्मण देसाई आणि पीएसआय जयदीप पालयेकर हे स्वतंत्रपणे करीत आहेत. परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंबंधी कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, संबंधितांकडून अधिक माहितीही घेतली जात आहे.


