‘वॉटर मेट्रो’बाबत पंचायत पातळीवर गैरसमज दूर करण्यासाठी विशेष जागृती

नदी परिवहन संचालक : वॉटर मेट्रो असणार केवळ प्रवासी सेवेसाठी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
06th August, 11:09 pm
‘वॉटर मेट्रो’बाबत पंचायत पातळीवर गैरसमज दूर करण्यासाठी विशेष जागृती

पणजी : गोव्यात प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाबाबत पसरत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प केवळ प्रवासी जलवाहतुकीसाठी असून इतर कोणत्याही उद्देशासाठी त्याचा वापर होणार नसल्याचे नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी स्पष्ट केले. बहुतांश ग्रामपंचायतींकडून या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

वॉटर मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी पहिली बैठक नुकतीच पार पडली. बैठकीला नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई, संचालक विक्रमसिंह राजेभोसले तसेच कोची मेट्रो रेल लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.

राजेभोसले म्हणाले की, डीपीआर तयार करण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असून नियोजित प्रक्रियेचा भाग म्हणून ही बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रकल्पाची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या वॉटर मेट्रो प्रकल्पामागे काही वेगळा हेतू असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मडगाव, दुर्भाट, चोडण आदी भागांतील ग्रामपंचायतींमध्ये जाऊन हा प्रकल्प फक्त प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जलवाहतूक सुधारण्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, संबंधित भागातील आमदार आणि मंत्र्यांशीही चर्चा सुरू असून ग्रामपंचायतींकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन मिळाल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

पणजी–मडगाव प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत

राजेभोसले यांनी सांगितले की, पणजी ते मडगाव हा प्रवास स्पीड बोटीने अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण झाला. रस्तेमार्गे याच प्रवासासाठी सुमारे दीड तास लागतो. तसेच वॉटर मेट्रोद्वारे वेर्णा परिसर जोडण्याचाही विचार सुरू असून त्यासाठी कुठ्ठाळी येथील मच्छीमार समाजाशी चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे सादर केलेल्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. प्रस्तावित १४ मार्गांपैकी पहिल्या टप्प्यात ९ मार्गांचा समावेश करण्याबाबत डीपीआरद्वारे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या अहवालातून प्रकल्पाचा खर्च, पर्यटन क्षमता आणि गोव्यातील जलवाहतुकीसाठी दीर्घकालीन आराखडा निश्चित केला जाईल, असे नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.  


हेही वाचा
सर्व पहा