महिला आशिया चषकाचे बिगुल वाजले

२८ ऑगस्टपासून दुबईत रंगणार स्पर्धा : ५ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
06th August, 11:52 pm
महिला आशिया चषकाचे बिगुल वाजले

दुबई: आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) महिला आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक गुरुवारी अधिकृतपणे जाहीर केले. या स्पर्धेत क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना ५ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना थायलंड आणि हाँगकाँग-चीन या संघांमध्ये खेळवला जाईल.

यावेळच्या महिला आशिया चषक स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे:

गट ‘अ’: भारत, पाकिस्तान, थायलंड, आणि हाँगकाँग-चीन.

गट ‘ब’ : श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती (यूएई), आणि इंडोनेशिया.

गट फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर तीन संघांशी सामने खेळेल. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

सर्व सामने दुबईत फ्लडलाईट्समध्ये

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेतील सर्व सामने संध्याकाळी फ्लडलाईट्स खेळवले जातील. गट फेरी आणि उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर, १३ सप्टेंबर रोजी महिला आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकाच गटात असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये या महामुकाबल्याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

संपूर्ण वेळापत्रक गट फेरी

दिनांक      वेळ         सामना

२८ ऑगस्ट रात्री ८ वा. थायलंड विरुद्ध हाँगकाँग

२९ ऑगस्ट रात्री ८ वा. श्रीलंका विरुद्ध संयुक्त अरब अमिराती

३० ऑगस्ट रात्री ८ वा. भारत विरुद्ध थायलंड

३१ ऑगस्ट रात्री ८ वा. बांगलादेश विरुद्ध इंडोनेशिया

१ सप्टेंबर रात्री ८ वा. पाकिस्तान विरुद्ध थायलंड

२ सप्टेंबर रात्री ८ वा. श्रीलंका विरुद्ध इंडोनेशिया

३ सप्टेंबर रात्री ८ वा. भारत विरुद्ध हाँगकाँग

४ सप्टेंबर रात्री ८ वा. संयुक्त अरब अमिराती विरुद्ध इंडोनेशिया

५ सप्टेंबर रात्री ८ वा. भारत विरुद्ध पाकिस्तान

६ सप्टेंबर रात्री ८ वा. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

७ सप्टेंबर रात्री ८ वा. पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग

८ सप्टेंबर रात्री ८ वा. बांगलादेश विरुद्ध संयुक्त अरब अमिराती

बाद फेरी (नॉकआऊट स्टेज)

दिनांक    वेळ          सामना

१० सप्टेंबर रात्री ८ वा. पहिली उपांत्य फेरी

११ सप्टेंबर रात्री ८ वा. दुसरी उपांत्य फेरी

१३ सप्टेंबर रात्री ८ वा. अंतिम सामना (फायनल)

टीप: सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता खेळवले जातील.

हेही वाचा
सर्व पहा