गुजरातवर गोव्याचा आठ गडी राखून विजय

सुयश प्रभुदेसाई. अभिनव तेजराणा यांची अर्धशतके

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
16th September, 11:31 pm
गुजरातवर गोव्याचा आठ गडी राखून विजय

बेंगळुरू : डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यात गोव्याने गुजरातचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरातने दुसऱ्या डावात २८७ धावा केल्यानंतर गोव्यापुढे विजयासाठी १५१ धावांचे लक्ष्य ठेवले. गोव्याने हे लक्ष्य २४.५ षटकांत दोन गडी गमावून सहज पार केले.
गोव्याच्या विजयाचा पाया सुयश प्रभुदेसाई आणि अभिनव तेजराणा यांनी रचला. प्रभुदेसाईने ४८ चेंडूंत ६१ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. तेजराणाने ८१ चेंडूंत नाबाद ६९ धावा करताना नऊ चौकार लगावले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी केली. दीपराज गावकर नऊ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी गोव्याने पहिल्या डावात ३८६ धावा करून गुजरातवर १३७ धावांची आघाडी घेतली होती. गुजरातच्या दुसऱ्या डावात स्मित पटेलने ७१, तर जयमीत पटेलने ६३ धावा केल्या. गोव्याकडून दर्शन मिसाळने चार, यश कसवणकरने तीन आणि ललित यादवने दोन गडी बाद केले. गुजरातचा दुसरा डाव ७२.३ षटकांत २८७ धावांवर संपुष्टात आला.
बेंगळुरू येथील बाल गंगाधरनाथ स्वामी मैदानावर हा सामना झाला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : पहिला डाव : २४९
गोवा : पहिला डाव : ३८६
गुजरात : दुसरा डाव : २८७ (७२.३ षटके)
स्मित पटेल ७१, जयमीत पटेल ६३, सुनप्रीत बग्गा ३४; दर्शन मिसाळ ४/६९, यश कसवणकर ३/६७, ललित यादव २/५८.
गोवा : दुसरा डाव : १५३/२ (२४.५ षटके)
सुवयश प्रभुदेसाई ६१, अभिनव तेजराणा नाबाद ६९, दीपराज गावकर नाबाद ९.