साळपे, कांदोळी येथे लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीसोबत विष्णू नाईक. (उमेश झर्मेकर)
गोवन वार्ता
म्हापसा
लाल (गुलाबी) रंगाच्या फळाबाबतच्या कुतूहलामुळे साळपे, कांदोळी येथील शेतकरी विष्णू नाईक यांनी गोव्यात ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केली आहे. गोव्यातील शेतकर्यांसाठी ते रोल मॉडल ठरले आहेत. विष्णू नाईक शेत लागवडीचा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहेत. नाईक कुटुंबीय बांबू (मानी) विक्रेते म्हणून प्रसिद्ध आहेत. विष्णू नाईक बांबूसह (कोणे) काजू, सागवान, माड यांच्यासह भाजीपाला लागवड करतात. त्यांचे भाजी विक्रीचे दुकान आहे. शिल्लक भाजी ते फलोत्पादन महामंडळाला विकतात.
राज्य सरकारकडून शेती लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून शेतकर्यांना वेगवेगळ्या राज्यांत आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवले जाते. सहा वर्षांपूर्वी विष्णू नाईक पुणे येथे प्रदर्शनाला गेले होते. तिथे त्यांनी प्रथमच गुलाबी-लाल फळ पाहिले. फळाबद्दल त्यांना कुतूहल निर्माण झाले. त्यांनी त्या फळाशी संबंधित माहिती जाणून घेतली. त्या फळाला ‘ड्रॅगन फ्रूट’ म्हणतात. हे फळ कुठेही पिकवले जाते व गोव्यातही ते होईल, असे त्यांना सांगण्यात आले.

प्रदर्शनाहून परतल्यावर नाईक यांनी शेतजमिनीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांचा प्रयोग फसला. त्यामुळे ते निरूत्साही झाले. चार वर्षांपूर्वी ते बंगळुरू येथील कृषी प्रदर्शनात सहभागी झाले. तिथे त्यांनी त्यांच्या शेतकरी मित्राकडे ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने त्यांना डॉ. करुणाकरन यांच्याकडे ‘आयआयएचआर’मध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना लागवडीबाबतची पूर्ण माहिती दिली. शेताच्या आजूबाजूला माड, आंबासारखी मोठी झाडे नकोत, असे डॉक्टरांनी सांगितले. नाईक यांनी लागवडीची तयारी दर्शवली. आठ दिवस राहून ड्रॅगन फळ लागवडीचे प्रशिक्षण घेतले.
गावी परतल्यावर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्धार केला. लागवडीसाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे काँक्रिट खांब त्यांनी घरीच बनवले. फेब्रुवारी २०२५ मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती. यंदा मे महिन्यात झाडाला पहिले फळ आले. १५ महिन्यांनी पीक आल्याने आनंद झाला, मेहनतीचे फळ मिळाले होते. या फळाला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. दरही चांगला मिळाला आहे. आतापर्यंत ३०० किलोपेक्षा जास्त उत्पादन मिळाले आहे, असे नाईक यांनी सांगितले.
चांगले मार्गदर्शन घेऊन शेती करा!
कृषी हा उत्तम व्यवसाय आहे. राज्य सरकार शेतकर्यांना भरपूर मदत देते. फक्त मेहनत करायची तयारी हवी. जास्त उत्पादन झाल्यास काही राज्यांत ते फेकून द्यावे लागते, मात्र गोव्यात फलोत्पादन महामंडळ कितीही उत्पादन झाले तरी विकत घेते. कृषी व्यवसायात उतरण्याची इच्छा असणार्या नागरिकांनी चांगले मार्गदर्शन घेऊन शेती करावी, असा सल्ला विष्णू नाईक यांनी दिला.
सुमारे १००० हेक्टर जागेत ड्रॅगन फळाची लागवड
विष्णू नाईक यांनी सुमारे १००० हेक्टर जागेमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली आहे. ड्रॅगन फळाच्या शेतीसाठी २५० खांब त्यांनी उभे केले असून प्रति खांब ४ रोप, असे एकूण १००० रोपे लावली आहेत. मे ते ऑक्टोबर असे सहा महिने ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न मिळू शकते.


