शालिनी अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री दोन अज्ञातांची घुसखोरी

बोर्डा- मडगाव येथील घटना; फातोर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
15th September, 11:34 pm
शालिनी अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री दोन अज्ञातांची घुसखोरी

मडगाव : बोर्डा- मडगाव येथील शालिनी अपार्टमेंट्स या निवासी संकुलात मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला.

शालिनी अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग मेंटेनन्स सोसायटीच्या सचिव सोनल सरदेसाई आणि खजिनदार नूतन नाईक यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, १४ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ ते ४.१० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सोसायटीच्या इमारतीत तसेच पार्किंग परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोघांनी संकुलात प्रवेश केला असावा, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी दोन्ही संशयित तेथून पसार झाले.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून फातोर्डा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (३) आणि ३ (५) अंतर्गत अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र साळगावकर पुढील तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.